Pune : परीक्षेच्या वेळापत्रकाचा पुनर्विचार करा

पुणे : शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकाचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे अन्यथा शिक्षण विभागाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा युवासेनेतर्फे देण्यात आला आहे.
राज्यातील इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या परीक्षा केव्हा घ्याव्यात याबाबतचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे. ८ मे २५ एप्रिल असा कालावधी ठरलेला आहे. विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, या उद्देशाने अनेक वेळा राज्याच्या शिक्षण विभागाने शाळांना सुट्टी दिली आहे. अशातच शिक्षण विभागाने अत्यंत कडक उन्हाळा असणाऱ्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा १५ एप्रिल पूर्वी संपवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचा निकाल शिक्षकांना योग्य पद्धतीने तयार करता येईल. अत्यंत कमी कालावधीत घाई गडबडीत निकाल तयार करण्याची वेळ शिक्षकांवर शिक्षण विभागाने आणली आहे.
विद्यार्थी, पालक यांच्या हिताचा विचार करून शिक्षण विभागाने परीक्षा आणि सत्र सुरू करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयावर पुनर्विचार करावा. त्याचप्रमाणे विद्यार्थी व बालकांमध्ये निर्माण झालेला गोंधळ दूर करावा, अशी मागणी युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी शिक्षण आयुक्तांकडे केली आहे.





