Pune real estate : पुण्यात घरखरेदीला वेग; नवरात्र-दसऱ्यात मागणी वाढण्याची शक्यता
Pune real estate : उत्सवी हंगामात पुण्यातील घरखरेदीला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ८० लाख ते १.५ कोटींच्या घरांकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे क्रेडाई पुणे मेट्रोने सांगितले.

Pune real estate : उत्सवी हंगामाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील घरखरेदीला ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. घरखरेदीदार अधिक माहिती घेऊन आणि दीर्घकालीन विचार करून निर्णय घेत असल्याचे क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष मनिष जैन यांनी सांगितले.
पुण्यातील निवासी बांधकाम क्षेत्र आता अधिक परिपक्व टप्प्यात आले आहे. प्रत्यक्ष घराची गरज असलेल्या ग्राहकांकडून मागणी होत असून, चांगले ठिकाण, दर्जेदार सुविधा आणि भविष्यातील मूल्य लक्षात घेऊन घरांची निवड केली जात असल्याचे जैन यांनी नमूद केले.
अलीकडील संशोधन अहवालांमध्येही तुलनेने महागड्या घरांकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे दिसते. नव्या प्रकल्पांमध्ये ८० लाख ते १.५ कोटी रुपयांच्या घरांचा वाटा लक्षणीय आहे.
गणेशोत्सवात पुण्यातील विविध गृहप्रकल्पांना भेट देणाऱ्या ग्राहकांची संख्या चांगली होती. यामध्ये आधीपासून घरांचा शोध घेणारे तसेच उत्सवी सवलतींचा लाभ घेऊन खरेदीचा निर्णय घेऊ इच्छिणारे ग्राहक मोठ्या संख्येने होते.
आगामी नवरात्र आणि दसऱ्यामुळे घरखरेदीला आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे. उत्सवी काळातील घरखरेदी आता केवळ शुभ मुहूर्तापुरती मर्यादित नसून ग्राहक घराची किंमत, सुविधा आणि भविष्यातील मूल्य यांचा विचार करून निर्णय घेत आहेत.
पुण्याच्या बांधकाम क्षेत्राची मूलभूत स्थिती भक्कम असल्याने नवरात्र आणि दसरा हा घरखरेदीसाठी महत्त्वाचा कालावधी ठरेल, अशी अपेक्षा जैन यांनी व्यक्त केली.





