Pune : मराठीत वाचा, लिहा, बोला…

पुणे : महाराष्ट्र राज्य व केंद्र शासनाच्या सर्व कार्यालयांमध्ये तसेच इतर सर्व प्रकारच्या संस्थामधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दि. १४ ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो. याअंतर्गत महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबविण्यास सुरूवात झाली आहे.
उच्च शिक्षण संचालनालयाच्या अपत्याखालील सर्व अकृषी विद्यापीठे, सर्व अभिमत विद्यापीठे, सर्व स्वयं अर्थसहायित विद्यापीठे आणि सर्व शासकीय , अशासकीय, अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित, महाविद्यालये यांनी विविध उपक्रम राबविण्याबाबतच्या सूचना शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.अशोक उबाळे यांनी परिपत्रक जारी केले आहे. कार्यवाहीचा अहवाल सर्व मविद्यालय, विद्यापीठांनी सादर करावा लागणार आहे.
मराठी भाषेसंबंधी, वाड्:मयासंबंधी विविध परिसंवाद, व्याख्याने, कार्यशाळा, शिबिरे कवि संमेलने, एकांकिका, बालनाट्ये, नाटके, पुस्तक प्रकाशन समारंभ, साहित्य पुरस्कार वितरण यांचे आयोजन करण्यात येत आहे. मराठी भाषेत निबंध, प्रश्नमंजुषा, कथाकथन, चारोळी लेखन, कथालेखन, कवितालेखन, हस्ताक्षर, शुद्धलेखन, वक्तृत्व, घोषवाक्ये, अभिवाचन, वादविवाद, अंताक्षरी शब्दकोडी, मराठी साहित्यासंबंधी पुस्तकांचे रसग्रहण, समीक्षण, परिच्छेद अनुवाद या स्पर्धाही घेता येणार आहेत.
मराठी वाचन संस्कृती वाढावी यादृष्टीने मराठी भाषेतील अभिजात ग्रंथांचा परिचय करून देण्यासाठी मराठी भाषेतील तज्ज्ञ नामवंत व्यक्ती, लेखक, वक्ते यांच्याकडून मार्गदर्शन, परिसंवाद, कार्यशाळा यांचे आयोजन करणे. ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथदिंडी, कथाकथन, काव्यवाचन, माहितीपट इत्यादी साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम करणे, मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व विकास यासाठी विविध मार्गानी स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्या व्यक्ती , संस्था यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करणे आदी उपक्रमांना प्राधान्य देण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.




