Pune : विद्यापीठातील शैक्षणिक विभागांना मानांकन

पुणे : विद्यापीठांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी विद्यापीठातील शैक्षणिक विभागांना मानांकन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता विद्यापीठाच्या विभागांकडून झालेल्या कामगिरीची मूल्यांकन करून विभागाची क्रमवारी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठातील शैक्षणिक विभागांना आपल्या दर्जात सुधारणा करावी लागणार आहे.
मुंबई विद्यापीठाने संशोधनाला चालना देण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक विभागांना मानांकन देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हा उपक्रम राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठांमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याबाबतचा शासन निर्णय उच्च शिक्षण विभागाने आज प्रसिद्ध केला आहे. यापूर्वी फक्त विद्यापीठ व महाविद्यालयांचे नॅकद्वारा मूल्यांकन केले जात असे. आता विद्यापीठाकडूनच त्यांच्या शैक्षणिक विभागांचे मूल्यांकन केले जाणार आहे.
हा उपक्रम दरवर्षी १ जुलै ते ३० जून या शैक्षणिक वर्षातील विभागांच्या शैक्षणिक, संशोधन व इतर कामगिरीच्या आधारित राबविण्यात यावा. या कालावधीत विद्यापीठाच्या विभागांकडून झालेल्या कामगिरीचे मूल्यांकन करून विभागाची क्रमवारी जाहीर करण्याची कार्यवाही जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत करण्यात यावी, असेही राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.
विभागांना मानांकन देण्याबाबतच्या उपक्रमाचे परिपत्रक संबंधित विद्यापीठांनी जुलै महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध करावे. विभागांनी आवश्यक ती कागदपत्रे दोन आठवड्यांत संबंधित प्रणालीवर अपलोड करावी आणि बाहेरील तज्ज्ञ समितीकडून मूल्यांकन पूर्ण करून घ्यावे. त्यांच्या अहवालानुसार विभागांची क्रमवारी जाहीर करावी. निकषानुसार सर्वोच्च गुण प्राप्त विभागास अनुदान, प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह प्रदान करावे. ज्या विभागांना निकषांनुसार कमी गुण प्राप्त झाले आहेत, अशा विभागांना त्यांचे मूल्यांकन उंचावण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
गुणवत्तेचा कस
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुमारे ५४ शैक्षणिक विभाग आहेत. यात विशेषत: विज्ञान शाखेच्या बहुसंख्य विभागातील संशोधनाचा दर्जाचा सर्वोत्तम आहे. आता विभागांचे मूल्यांकन आणि क्रमवारी जाहीर केली जाणार असल्याने त्यांच्यात गुणवत्तेची स्पर्धा लागेल. त्यातून विद्यापीठाचे नावलौकिक वाढण्यास आणखी मदत होणार आहे.




