Pune Rain Update | पावसाचा अचानक कहर! पुणेकरांची तारांबळ ; चिंचवडमध्ये सर्वाधिक ४० मिमी पावसाची नोंद

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शहरासह उपनगरात दुपारी पावसाने दमदार हजेरी लावत पुणेकरांची धांदल उडवली. रात्री उशिरापर्यंत अधून-मधून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या. चिंचवड परिसरात सर्वाधिक ४० मिमी पावसाची नोंद झाली. लोहगांव, हडपसर, हवेली, शिवाजीनगर, मगरपट्टा आणि कोथरूड परिसरात पावसाच्या मध्यम सरींनी रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहू लागले.सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे रविवार (दि. १४) सुट्टीचा दिवस असतानाही पुणेकरांनी घरीच थांबून विश्रांती घेण्यास पसंती दर्शवली.
त्यामुळे पाऊस सुरू झाल्यावर पर्यटनस्थळावर होणारी गर्दी आज काहीशी कमी असल्याचे दिसून आले. सकाळपासून शहरात काळे ढग भरून आले. अधून-मधून सुर्यनारायण दर्शन देत होते. मात्र, दुपारी बारानंतर कोथरूड, बावधन, कात्रज, धायरी, औंध, पाषाण, हांडेवाडी, धनकवडी, हडपसर, मगरपट्टा, विश्रांतवाडी, खराडी, सिंहगड रस्ता, येरवडा, खडकी यासह पिंपरी-चिंचवड परिसरात पावसाच्या हलक्या ते मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडल्या.
काहीवेळ विश्रांती घेतल्यावर सायंकाळीही शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाच्या सरींना सुरवात झाली. त्यामुळे खरेदीसाठी शहरातील बाजारपेठांमध्ये आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. मुख्य रस्त्यांसह चौकांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतुकही मंदावली. आज सायंकाळपर्यंत शहरातील हवेली परिसरात १०, हडपसर आणि तळेगांव येथे प्रत्येकी ९, शिवाजीनगर परिसरात ८, मगरपट्टा येथे ७, गिरीवन येथे ५, पाषाण परिसरात ३ तर माळीण आणि बारामती येथे २ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन दिवसांत शहरासह उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. पावसाच्या मध्यम सरी तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात मागील ४८ तासांत पावसाचा जोर वाढला आहे. घाट विभागातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासात ताम्हिणी घाटमाथ्यावर ३०, अंबवने येथे ५०, मुळशी धरण परिसर ११, दावडी घाटमाथ्यावर ३९, लोणावळा येथे १२, डुंगरवाडी येथे ५५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार असून, अति जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट दिला आहे.





