शहरात पावसाची संततधार
pune rain update

पुणे – शहर परिसरात सोमवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. दिवसभर ढगाळ वातावरण आणि थोड्या-थोड्या अंतराने पडणारी पावसाची सर असे चित्र शहरात पाहायला मिळाले. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार येत्या 30 जुलैपर्यंत शहरात पाऊस कायम राहणार आहे.
शहर परिसरात गेल्या आठवडाभरापासून पावसाने चांगला जोर धरला आहे. शुक्रवारी (दि.26) एकाच दिवसात पावसाने विक्रमी हजेरी लावत जुलै महिन्यातील पावसाची सरासरी गाठली. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी अनेक भागांमध्ये पावसाची चांगली हजेरी लागत आहे. शहरातदेखील थोड्या थोड्या अंतराने पावसाची जोरदार सर पडत असते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या किनारपट्टी भागात कमी दाबाचे क्षेत्र अथव द्रोणीय स्थिती कार्यरत नसली, तरी समुद्रातून वाऱ्यांनी खेचून आणलेल्या बाष्पाचे प्रमाण अजूनही हवेत कायम आहेत.
विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार, शिवाजीनगर येथे 4.5 मिमी, पाषाण येथे 4.0, लोहगाव येथे 3.0 मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. तर आशय मेझरमेंट प्रायव्हेट लिमिटेड या खासगी संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या नोंदीनुसार कात्रज येथे 3.2 मिमी, खडकवासला येथे 5.2 मिमी, वारजे येथे 2.8 मिमी आणि कोथरूड येथे 2.6 मिमी पावसाची नोंद घेण्यात आली.





