Pune Rain: उकाड्याची सुट्टी, पावसाची एन्ट्री! पुण्यात पुढील २४ तास महत्त्वाचे; हवामान विभागाचा मोठा अंदाज
Pune Rain: एनडीए, खडकवासला आणि वारजे परिसरात ढगफुटीसदृश पाऊस; सोसायट्या आणि दुकानांमध्ये पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत.

Pune Rain – मागील दोन आठवड्यांपासून असह्य उकाडा आणि कडक उन्हाच्या चटक्याने हैराण झालेल्या पुणेकरांना रविवारी (दि. २१ जून) दुपारनंतर झालेल्या दमदार मान्सूनपूर्व पावसाने मोठा दिलासा दिला. विशेषत धरणक्षेत्रासह हवेली परिसरात जोरदार पाऊस झाला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत एनडीए परिसरात सर्वाधिक ७९ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे या परिसरातील रस्ते जलमय झाले होते. दुकाने आणि सोसायट्यांमध्ये पाणी घुसल्याने पहिल्याच पूर्वमोसमी पावसाने जनजीवन विस्कळीत केले.
शिवाजीनगर परिसरात १९, हडपसर येथे ९, तर पाषाण परिसरात ४ मिमी पावसाची नोंद झाली. जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणारा मान्सून अद्याप पुण्यात पोहोचला नसला, तरी पुढील २४ तासांत मान्सूनला पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण होत असून, लवकरच मान्सून पुण्यात दाखल होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. दरम्यान, यंदा जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे शहरातील कमाल तापमानाने तब्बल ४० अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली होती.
गेल्या आठ दिवसांत हे तापमान ३७ अंशांच्या आसपास रेंगाळत होते. सततच्या वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत होती, अशा परिस्थितीत आज दुपारनंतर हजेरी लावलेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण केला. रविवारी (दि. २१) सकाळपासून शहरात ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव सुरू होता. दुपारनंतर मात्र हवामानात अचानक बदल झाला. दुपारी बाराच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये काळे ढग जमा झाले आणि पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर काही वेळ विश्रांती घेऊन दुपारी तीनच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने दमदार पुनरागमन केले.
दुपारनंतर सुमारे तासभर झालेल्या या मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य रस्ते जलमय झाले होते. रविवारच्या सुट्टीमुळे शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होती. अचानक आलेल्या पावसामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक आडोसा शोधण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली. मात्र, असे असले, तरी उन्हाच्या चटक्यापेक्षा हा पाऊस बरा, अशा भावना व्यक्त करत पुणेकरांनी या पावसाचे स्वागत केले. सायंकाळनंतरही शहराच्या विविध भागांत पावसाच्या रिमझिम सरी सुरूच होत्या.
शहरासह उपनगरांत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत झालेला पाऊस
एनडीए ७९, खडकवासला ५७, वारजे २५, शिवाजीनगर १९, आंबेगाव- कात्रज ११, हडपसर ९, डेक्कन ८ मिमी पावसाची नोंद झाली.






