Pune rain: ऐन दिवाळीत पावसाळा! सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी, पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह वर्षा
Pune rain:

लोहेगाव २७ मिमी. मगरपट्टा- १६ मिमी चिंचवड ११.५ मिमी शिवाजीनगर १०.९ मिमी पाषाण ७.८ मिमी एनडीए ७ मिमी.
Pune rain: ऑक्टोबरमध्ये पाठ फिरवलेल्या पावसाने सलग दुसऱ्या दिवशी शहर परिसरात हजेरी लावली. गेल्या तीन-चार दिवसांपासूनचे ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हजेरीमुळे दिवाळीच्या तोंडावर पावसाळा सुरू झाल्याचे वातावरण होते. त्यातच हवामान विभागाने (आयएमडी) पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
रविवारच्या पावसानंतर सोमवारी पहाटे, सकाळी झालेल्या पावसामुळे गारवा निर्माण झाला. शहरातील हवेत आर्द्रतेचे प्रमाणही जास्त होते. शिवाजीनगरमध्ये २१.२ अंश, पाषाणमध्ये २१.४, लोहेगावमध्ये २१.२, मगरपट्टामध्ये २१.५ आणि एनडीए येथे २१ अंश सेल्सिअसचे किमान तापमान नोंदवले.
येत्या दोन दिवसांत वातावरण ढगाळ राहणार असून, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. गुरुवारपासून (दि. ५) मात्र पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. गुरुवारी कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. शुक्रवारपासून (दि. ६) आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारनंतर अंशतः ढगाळ होण्याची शक्यता आहे. शनिवार आणि रविवारी (दि. ७ आणि ८) कमाल तापमान अनुक्रमे ३२ आणि ३३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागरात रविवारी असलेले आग्नेय आणि नैऋत्य भागात कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम वायव्येस सरकले असून पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर आले आहे. या प्रणालीमुळे दक्षिण आणि पश्चिम द्वीपकल्पीय भारताच्या काही भागांकडे आर्द्रता खेचली जात आहे. परिणामी ढगाळ वातावरण, पाऊस आणि मेघगर्जनेसाठी अनुकूल परिस्थिती आहे.
१२-१३ झाडपडी Pune rain:
गेल्या दोन दिवसांतील मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याचे सुमारे ३५ फोन आल्याचे महापालिकेच्या आपत्कालिन विभागाने सांगितले. याशिवाय १२-१३ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या असून कोणतीही जिवितहानी झाली नाही. शहरात वेगवेगळ्या भागात कमीजास्त पावसाची नोंद झाली आहे.
कात्रज, आंबेगाव, व्हिआयटी काॅलेज परिसर, उंड्री, नगररस्त्यावरील तरवडे वस्तीसह काही भागात पाणी साचले. पावसाळी जाळ्यांमध्ये कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा होत नव्हता, त्यामुळे त्या त्या क्षेत्रीय कार्यालयाशी समन्वय साधून या समस्या सोडविल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख गणेश सोनुने यांनी दिली.
शहरात पाऊस धरणे कोरडीच.. !
शहरात सर्वदूर पावसाने हजेरी लावली तरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाने पाठ फिरविली आहे. खडकवासला धरणात किरकोळ पाऊस वगळता इतर कोणत्याही धरण क्षेत्रात पाऊस झालेला नाही. सोमवारी पहाटे ते संध्याकाळी ६ पर्यंत खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १२ मिमी पावसाची नोंद झाली. पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठयात कोणतीही वाढ झालेली नाही.
वीजपुरवठा तासंतास खंडित Pune rain:
दोन दिवसांतील मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका महावितरणला असून, उपकेंद्रांमधील किरकोळ तांत्रिक बिघाडामुळे शहरात सकाळी अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. रविवारी मध्यरात्रीनंतर विजांच्या कडकडाटासह सुरू झालेला पाऊस सोमवारी सकाळपर्यंत अधूनमधून सुरूच होता. पावसामुळे मुख्य वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला. परिणामी, कोथरूड, कर्वेनगर, हडपसर, कात्रज, सिंहगड रस्ता, पद्मावती आणि नगर रस्ता परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता.
ऐन सकाळी कामावर जाण्याच्या आणि शाळा-महाविद्यालयांच्या वेळेतच वीज गेल्याने नागरिकांना, विशेषतः गृहिणींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणी पुरवठा काही ठिकाणी विस्कळीत झाला. महावितरणच्या आपत्कालीन पथकाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. पावसामुळे दुरुस्तीत अडथळे येत असले, तरी काही तासांच्या प्रयत्नांनंतर बहुतांश भागांतील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत केला.





