पुणे : घाटमाथ्यावर पाऊसच पाऊस; काही भागांत अतिवृष्टीचा इशारा

पुणे -जिल्ह्यासह राज्यातील घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे गेल्या 24 तासांत ताम्हिणी घाटात सर्वाधिक 230 मिमी पावसाची नोंद झाली. तसेच अंबवने, धावडी, डुंगरवडी, भिरा आणि शिरगाव या भागातील घाटमाथ्यावर जवळपास दीडशे ते दोनशे मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, घाटमाथ्यावर पावसाचा आणखी जोर वाढेल, तर काही भागांत अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळने वर्तविला आहे.
घाटमाथ्यावर दोन दिवस पावसाचा जोर कमी झाला होता. त्यात सुट्टीचा दिवस, त्यामुळे घाटमाथ्यावरील धबधबे, फार्महाऊस, धरणक्षेत्र याठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढू लागली. शनिवारपासून या परिसरात पुन्हा पावसाने जोर पकडला असून, ताम्हिणी, डुंगरवाडी आणि शिरगाव भागात सर्वाधिक पाऊस आहे. सलग आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धबधब्यांनीही रौद्ररूप धारण केले आहे. काही भागात धबधब्यांचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे मार्ग बंद झाला आहे.
पर्यटकांना सावधतेचा इशारा
डोंगर, घाटमाथा परिसरात आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दरड कोसळण्याची भीती वाढली आहे. त्यामुळे दरडप्रवणक्षेत्रात राहणाऱ्यांचे स्थलांतरण आवश्यक असून, घाटमाथ्यावर रस्ता निसरडा आणि दरड कोसळण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे पर्यटकांनी सध्या घाटमाथ्यावर फिरायला जाणे टाळावे, असे आवाहन हवामन विभाग, पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे
घाटमाथ्यावर झालेला पाऊस (मि.मी.)
लोणावळा-137, शिरगाव-170, शिरोटा-62, वळवण-123, अंबवणे-210, भिवपुरी-104, धावडी-192, डुंगरवाडी-187, कोयना-158, खोपोली-97, खंद-112, ताम्हिणी-230, भिरा-149, धारावी-52 मि.मी. पाऊस झाला.





