pune rain :शहरासह उपनगरांत पावसाचा जोर ओसरला
pune rain :

pune rain : शहर आणि उपनगरांमध्ये मंगळवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला असून, दुपारनंतर पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेनंतर मिळालेल्या या उघडीपेमुळे पुणेकरांना दिलासा मिळाला.
मात्र, पाऊस थांबल्यामुळे शहर आणि जिल्ह्यात कमाल तापमानात १ ते २ अंशांची वाढ नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
मागील आठवडभरापासून २६ अंशांपर्यंत खाली आलेले पुणे शहराचे तापमान आज २८ ते २९ अंशांवर पोहोचले. बारामती येथे सर्वाधिक ३०.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दुपारच्या वेळी कमाल तापमान वाढल्याने हवेतील गारवा कमी झाला असला, तरी रात्रीच्या वेळी उपनगरांमध्ये चांगला गारवा जाणवत आहे.
आज दिवसभरात जिल्ह्यात हलका पाऊस झाला. त्यामध्ये भोर परिसरात सर्वाधिक १६ मिमी, शिरूर येथे ८ मिमी, शिवाजीनगर येथे ४ मिमी, तर वडगावशेरी, पाषाण आणि एनडीए परिसरात १ ते ३ मिमी पावसाची नोंद झाली.
पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील. तसेच आगामी ३ ते ४ दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.





