Pune : तळजाईसाठी शुद्ध केलेले सांडपाणी; महापालिकेचा प्रस्ताव

पुणे : शहराच्या फुफ्फुसासारखी ओळख असलेल्या तळजाई टेकडीवरील हिरवाई आता मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातील पाण्यावर फुलणार आहे. तेथे महापालिकेच्या विठ्ठलवाडी येथील एसटीपीत प्रक्रिया झालेले पाणी वापरण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने दिलेल्या प्रस्तावाला वन विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यानांतर या दोन्ही विभागांची बैठक बुधवारी पार पडली.
सुमारे २५७ हेक्टरवर पसरलेल्या या वनक्षेत्रात अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी आणि वनस्पतींचा अधिवास आहेत. मात्र, उन्हाळ्यात ही हिरवाई मरगळलेली वाटते. वृक्ष लागवडीनंतर त्यांच्या संगोपनासाठी टँकरने पाणी टाकावे लागते. यात वेळ, पैसा आणि प्रयत्न मोठ्या प्रमाणावर लागतात.
मात्र, हा निर्णय झाल्यास वन विभागाची पाण्याची अडचण कायमची सुटणार आहे. विठ्ठलवाडी येथील एसटीपी केंद्रही टेकडीच्या पायथ्याजवळ असल्याने त्याचाही फायदा होणार असून, वनराई टिकवण्यास मोठी मदत होणार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा वापरही टळणार असून, टँकरसाठी होणाऱ्या कोट्यवधींच्या खर्चात बचत होणार आहे, तसेच हे पाणी केवळ तळजाई टेकडीपुरते न देता शेजारील पाचगाव, पर्वतीसारख्या इतर वनक्षेत्रांनाही त्याचा लाभ मिळावा, या उद्देशाने या कामाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
आराखडा तयार
महापालिकेच्या विद्युत विभागाकडून या कामासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत या टेकडीसाठी पाणी कोठे न्यावे, जलवाहिनी कशी वर नेली जाईल, याचा प्राथमिक आराखडा महापालिकेने तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची तयारीही पालिकेकडून दखविण्यात आली असून, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये महापालिकेने वन विभागाला याबाबत पत्र पाठवले होते.
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुधवारी वन विभागाचे अधिकारी आणि आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत बैठक झाली असून, वन विभाग या प्रस्तावाबाबत सकारात्मक असल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाच्या प्रमुख मनीषा शेकटकर यांनी दिली.





