Pune : पुणेकरांनो उष्माघातापासून सावधान!

पुणे : फेब्रुवारी महिन्यापासूनच सूर्यनारायण तापल्यामुळे पुणेकरांनो यंदाचा उन्हाळा कडक असणार आहे. त्यामुळे उष्माघातापासून स्वत:सह लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गरोदर मातांचा बचाव करण्यासाठी वेळीच खबरदारी घ्या. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पारा चाळीशीवर पोहोचल्यामुळे दिवसभर अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे आवश्यक असेल, तरच घराबाहेर पडा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
दरवर्षी शेकडो व्यक्तींना उष्माघाताचा त्रास होतो. त्यामध्ये तीव्र डोकेदुखी, उलट्या, श्वास घेण्यास त्रास, त्वचा कोरडी पडून घाम येणे बंद होणे, चक्कर येणे, बेशुद्ध अवस्था अशी लक्षणे दिसतात. मागील तीन वर्षांत २०२३ मध्ये तब्बल ३ हजार १९९ जणांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. २०२४ मध्ये ३४७ जणांना उष्माघाताचा त्रास होऊन एकाचा मृत्यू झाला, तर २०२५ मध्ये फेब्रुवारी महिन्यात शहरासह जिल्ह्यात उष्णतेचा चटका वाढला आणि मागील महिन्याभरात ४ जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे.
उन्हाळ्यामध्ये उष्माघाताचा त्रास सर्वाधिक लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गरोदर माता यांच्यासह श्रमाचे काम करणारे आणि आजारी व्यक्तींना (मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडनीचे आजार) जाणवतो. त्यामुळे या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे, असे डॉ. प्रेमचंद कांबळे यांनी सांगितले.
अशी घ्या काळजी
– पुरेसे आणि स्वच्छ पाणी प्या
– हलका आहार घ्या
– हलके आणि सैल कपडे घाला
– दुपारी थंड ठिकाणी राहा
– उन्हात जाताना डोके, चेहरा झाकून ठेवा
– फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा
– उन्हात जाणे टाळा
– थंड पाण्याने आंघोळ करा
– कामाच्या वेळा उष्णतेच्या तीव्रतेनुसार ठरवा
हे टाळा…
सकाळी ११ ते दुपारी चार दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.
गडद रंगाचे आणि जाड कपडे घालणे टाळा
दुपारच्या वेळी शारीरिक श्रमाची कामे टाळा
कोल्ड्रिंक्स, सोडा किंवा अल्कोहोलयुक्त पेय टाळा
भूक नाही म्हणून जेवण वगळू नका, हलका आहार घ्या
वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडून जाऊ नका
म्हणजे काय…
* उष्णता लागणे – तीव्र डोकेदुखी, उलट्या, श्वास घेण्यास त्रास, त्वचा कोरडी पडून घाम येणे बंद होणे, चक्कर येणे, बेशुद्ध अवस्था,
* डिहायड्रेशनची लक्षणे – शरीरात पाण्याची कमतरता, तोंड कोरडे पडणे, कमजोरी, लघवी कमी होणे
* उष्णतेचा थकवा – खूप घाम येणे, रक्तदाब कमी होणे, अशक्तपणा, हृदयाचे ठोके वाढणे
* उष्णताघात – स्नायूंमध्ये, विशेषतः पाय आणि हातांमध्ये वेदना





