Pune : पीएमपी ॲपवर पुणेकर फिदा

पुणे : पुणेकरांची जीवनवाहिनी असलेली पीएमी काळाप्रमाणे बदलत आहे. सध्या बस कुठे आहे, ती किती वेळात बसस्टाॅपवर येणार याची अचूक माहिती देणारे आपली पीएमपी मोबाइल ॲप पुणेकरांच्या पसंतीला उतरले असून आतापर्यंत १५ लाख प्रवासी ॲपशी जोडले गेले आहेत.दैनंदिन प्रवासी संख्येचा विचार करता जवळपास ८० टक्के प्रवासी डिजिटल पद्धतीचा अवलंब करत आहेत. त्यामुळे पीएमपीच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. ॲपवरून ऑनलाइन तिकिट आणि पासही घेता येतो.
काळाच्या बरोबर राहण्यात पुण्याचा हात कोणी धरू शकत नसल्याने या ॲपला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. १५ ऑगस्ट २०२४ रोजी हे ॲप सुरू झाल्यावर सुरवातीला येणाऱ्या तांत्रक अडचणीमुळे प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता. मात्र, याबाबत पीएमपी प्रशासनाने जनजागृती केल्यानंतर ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता ही संख्या १५ लाखांच्यावर पोहचली आहे. विशेष म्हणजे आयफोनधारक प्रवासीही ॲप डाउनलोड करत असल्याने ॲपचे वापरकर्ते वाढत आहेत.
पीएमपीच्या ॲपचा १५ ऑगस्ट २०२४ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान सव्वा कोटी पुणेकरांनी लाभ घेतला. त्यातून पीएमपीला तब्बल २१ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले. २६ जानेवारी २०२५ मध्ये आपली पीएमपीएमएल या मोबाईल ॲपचे आय.ओ.एस. व्हर्जन सुरू करण्यात आले. त्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद आणखीन वाढू लागला आहे. दररोज हे ॲप डाऊनलोड करण्याचे प्रमाण वाढत असून, उत्पन्नातही नवनवीन टप्पे गाठत आहे.
प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी पीएमपी कटिबध्द आहे. त्यातूनच सुरू केलेल्या अत्याधुनिक ॲपला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, ऑनलाईन सुविधेमुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आङे. तसेच तर सुट्ट्यां पैशांवरून होणारे वादही कमी झाले आहेत.
सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी
ॲपचा फायदा काय ?
– सर्व बसचे लाईव्ह ट्रॅकिंग
– बसथांब्यावर बस किती वेळात येणार हे समजणार
– ऑनलाईन तिकीट काढता येणार
– दैनंदिन पास काढता येणार
– तक्रार नोंदविता येणार





