Pune : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे; आज आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : २३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी पाच वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना पीफ डिस्टींग्वीश अॅवार्ड, तर ज्येष्ठ गायिका कविता कृष्णमूर्ती यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार एस. डी. बर्मन पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. फिल्मसिटी मुंबईच्या एमडी स्वाती म्हसे -पाटील यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाची थीम ही शो मॅन : राज कपूर जन्मशताब्दी वर्ष आहे. यंदा प्रख्यात चर्मवाद्यवादक विजय चव्हाण आणि सहकारी यांच्या वादनाने उद्घाटन सोहळ्याची सुरुवात होईल.
दि. १३ ते २० फेब्रुवारी या महोत्सव कालावधीत आयोजित या चित्रपट महोत्सवात विविध देशी-विदेशी सुमारे १५० चित्रपट, जागतिक स्पर्धा विभागातील १४ आणि मराठी स्पर्धा विभागातील ७ चित्रपट दाखवले जाणार आहेत.




