Pune : नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडलाचे ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा!’ सर्वोत्कृष्ट

पुणे : महावितरणच्या पुणे प्रादेशिकस्तरीय आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे पुणे परिमंडलाने ‘डॉक्टर, तुम्हीसुद्धा!’ या नाटकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण करीत प्रथम क्रमांकाचा करंडक पटकाविला. आता हे नाटक नाशिक येथील राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. तर बारामती परिमंडलाचे ‘राहिले दूर घर माझे’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचा मान मिळाला.
पद्मावती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात दोन दिवसीय नाट्यस्पर्धेचा समारोप झाला. पारितोषिक वितरण कार्यक्रमाला संचालक राजेंद्र पवार, प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, कार्यकारी संचालक दिनेश अग्रवाल व दत्तात्रेय पडळकर तसेच मुख्य अभियंता सुनील काकडे, स्वप्निल काटकर आणि धर्मराज पेठकर यांची उपस्थिती होती.
या नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडलकडून अजित दळवी लिखित ‘डॉक्टर, तुम्हीसुद्धा!’, कोल्हापूर परिमंडलाकडून चं. प्र. देशपांडे लिखित ‘सामसूम’ तर बारामती परिमंडलद्वारे शफाअत खान लिखित ‘राहिले दूर घर माझे’ ही नाट्यकृती सादर करण्यात आली. या नाटकांना पुणेकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. नाट्यपरीक्षक म्हणून अर्चना कुबेर, सुनील देवळीकर, ज्ञानेश्वर धमाळ यांनी काम पाहिले.
सूत्रसंचालन अर्णव लिडबिडे, दीपश्री सरोदे, महेश कारंडे यांनी केले. आयोजन समितीचे सचिव व उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भूपेंद्र वाघमारे यांनी आभार मानले.




