पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) ५ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट- ब सेवा मुख्य परीक्षोतील पोलीस उपनिरीक्षक अर्थात पीएसआय संवर्गातील ३७४ पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे. या यादीत अतिश मोरे हा सर्वाधिक गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. सर्वसाधारण गुणवत्ता यादी उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने तयार करण्यात आली आहे. अंतिम निकालापूर्वी पडताळणी केल्यानंतर काही उमेदवारांच्या शिफारशींमध्ये बदल होऊ शकतो. खेळाडू व अनाथ प्रवर्गांतून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्र प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून पडताळणीच्या आधीन राहून त्यांचा प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला आहे. ही यादी न्यायालयात दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयाच्या आधीन राहून जाहीर करण्यात येत आहे. प्रमाणपत्राची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर खेळाडू व अनाथ प्रवर्गांतील संवर्गांची तात्पुरती निवड जाहीर होईल. त्यानंतर प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्यायही उपलब्ध करून दिला जाईल. अंतिम गुणवत्ता यादीच्या आधारे उमेदवारांच्या शिफारशी करण्यात येतील, अशी माहिती एमपीएससीकडून देण्यात आली आहे.