पुणे : हडपसर रेल्वे टर्मिनल स्थानकाचा विकास गतीने होत असून, भविष्यात या टर्मिनलवरून एक्सप्रेस गाड्यासह लोकल धावणार आहेत. त्यामुळे टर्मिनलवरून शहराच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी टर्मिनल परिसरात बसस्थानकासाठी जागा देण्याची मागणी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. ही जागा मिळाल्यास पीएमपीएलला सेवा वाढविता येईल आणि त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. पुणे रेल्वे स्थानकवार प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे पर्यायी रेल्वे स्थानक म्हणून हडपसर टर्मिनल विकसीत केले जात आहे. हडपसर टर्मिनल सुरू होऊन तीन वर्षे झाले असून, पहिल्या टप्यातील काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी सध्या तीन प्लॅटफॉर्म आहेत. त्यामुळे सुरवातीला नांदेड एक्सप्रेस व हैदराबाद एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर नांदेड एक्सप्रेस देखील पुणे स्टेशनवरून सुरू करण्यात आली. या टर्मिनलच्या विकासासाठी १३५ कोटी रूपये रेल्वे बोर्डाने मंजूर केले आहेत. त्यानुसार रेल्वेकडून हडपसर टर्मिनलचा विकास सुरू आहे. हडपसर टर्मिनल येथून सध्या एकच एक्स्प्रेस धावते. तर, एक लोकल सेवा देखील सुरू आहे. तसेच, विशेष गाड्या देखील हडपसर येथून सुरू आहेत. प्रवाशांच्या सोईसाठी पीएमपीने हडपसर टर्मिनल ते हडपसर पीएमपी स्थानक अशी सेवा सुरू ठेवली आहे. पुणे रेल्वे स्टेशनचे रिमॉडलिंगचे काम सुरू केल्यानंतर बऱ्याच गाड्या हडपसर येथून सोडाव्या लागणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी तेथून बस वाढवाव्या लागणार आहेत. मात्र, टर्मिनलकडे जाणारे रस्ते अरूंद असून, त्या ठिकाणी बस उभ्या करण्यासाठी पुरेशी जागा नाही. हडपसर टर्मिनलचा विकास सुरू असताना त्या ठिकाणी पीएमपी स्थानक सुरू करण्यासाठी पाच ते सहा गुंठे जागा द्यावी, अशी मागणी पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे मुंढवा मार्गे जाणाऱ्या बहुतांश गाड्या हडपसर टर्मिनल येथून सुरू करता येणार आहेत. रस्त्यावरील अतिक्रमण दूर करा हडपसर टर्मिनलकडे जाणारे दोन रस्ते अरूंद आहेत. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, महापालिकेने हे अतिक्रमण दूर करावे. त्यामुळे पीएमपीच्या गाड्यांना रस्त्यावरून जाण्यास अडचण होणार नाही, अशी मागणी पीएमपीकडून महापालिकेकडे करण्यात आली आहे.