पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळावे, या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत पावसात चिखलात बसून विद्यापीठ प्रशासनाचा निषेध नोंदवला. पुणे विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत वसतिगृहे अपुरी पडत आहेत. याबाबत अनेकदा निवेदने, पत्रव्यवहार करूनही मागणी मान्य होत नसल्याने विद्यापीठ परिसरात वसतिगृह क्रमांक १० येथे संघटनांनी एकत्र येत चिखल आंदोलन केले. एनएसयुआय, डाप्सा, एसएसडी, एमआरपी, एएसपी या संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला. पुणे विद्यापीठातील वसतिगृहांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. वसतिगृहात सोयी सुविधा नाहीत, येथे प्रवेश घेतलेलेल्या विद्यार्थ्यांना पावसाळ्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वसतिगृह प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. याच कारणाने विद्यार्थी वसतिगृह सोडून जात आहेत. वसतिगृहात पुरेशा सुविधा नाहीत. बाहेर राहणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परवडत नसल्याने ते गावी परतत आहेत. विद्यापीठ प्रशासनाने लवकरात लवकर वसतिगृहांचा प्रश्न मार्गी लावावा; अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनांनी दिला.