Pune : मनसेकडून दुचाकींना संरक्षक तार
पुणे : सणांची परंपरा जपली पाहिजे मात्र त्यावेळी नागरिकांच्या सुरक्षेचाही विचार होणे महत्वाचे आहे. मकरसंक्रांत आल्यावर शहरात दररोज मांजामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत, त्या टाळण्यासाठी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि हेल्प रायडर्स (एक जीव वाचविण्याची चळवळ) यांच्या वतीने दुचाकीला संरक्षण तार बसविण्याचा उपक्रम घेण्यात आला.
यावेळी पहिल्याच दिवशी ३८७ दुचाकींना मोफत अशी संरक्षण तार बसविण्यात आली, अशी माहिती आयोजक प्रशांत कनोजिया यांनी दिली. नवीन वर्षाची सुरुवात मकर संक्रांतीने होते. शहरात लहान मुले आणि तरुणाई पतंग उडविण्याचा आनंद घेतात. मात्र, आपल्या आनंदात दुसऱ्यांचा जीवाला धोका पोहचत नाही ना, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे.
कारण, याच पतंगाच्या नाॅयलाॅन मांजामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे. गेल्या काही दिवसात या मांजामुळे नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशांत कनोजिया यांनी बालगंधर्व चौकात नागरिकांच्या दुचाकीला मोफत संरक्षण तार बसवण्याचा उपक्रम सुरू केला.
यावेळी नरेंद्र तांबोळी, विनायक कोतकर, बाळासाहेब ढमाले, प्रवीण पगारे, धनंजय दळवी, केतन डोंगरे, प्रवीण कदम, गौरव दांगट, अभिजीत देशमुख, सुबोध घोडके, प्रथमेश व्हनमोरे, मयुर शेवाळे, अविनाश वाघमारे, विनायक मुरुडकर, सुरेश पोतदार, संतोष कदम, शंकर म्हाळुंगे, संदेश परदेशी, सागर इंगळे, संतोष पोळ, निलेश चांडगे, प्रकाश रणदिवे यांनी परिश्रम घेतले.





