Pune : मेट्रोकडून नव्या ट्रेन्स खरेदीचा प्रस्ताव

पुणे – वाढती प्रवासी संख्या आणि मार्गिकेच्या विस्ताराला नुकतीच मिळालेली परवानगी लक्षात घेता पुणे मेट्रोने त्यांच्या ताफ्यात तीन डब्यांच्या १५ गाड्या (ट्रेन्स) दाखल करण्याचा प्रस्ताव पुणे मेट्रोने दिला आहे. गेल्या महिनाभरापासून मेट्रोच्या प्रवासी संख्येत काहीशी वाढ झाली आहे.
तसेच, बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वनाझ ते रामवाडी मार्गिकेच्या विस्ताराला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ अपेक्षित असल्याने पुणे मेट्रोने त्यांच्या ताफ्यात नव्या मेट्रो ट्रेन्स दाखल करण्याच्या विचारात आहे.
सध्या पुणे मेट्रोकडे ३ डब्ब्यांच्या ३४ गाड्या आहेत. त्यामुळे सध्या दोन्ही मार्गांवर प्रत्येकी १० मिनिटांच्या अंतरावर एक मेट्रो उपलब्ध होते. त्यामुळे विस्तार झाल्यानंतर या गाड्यांवरचा ताण वाढेल हे लक्षात घेत अतिरिक्त गाड्यांची मागणी करण्यात आली आहे.
यानंतर पुणे मेट्रोकडे तीन डब्ब्यांच्या ४९ गाड्या असतील. आवश्यकता पडल्यास या गाड्यांच्या डब्ब्यांमध्ये ६ पर्यंत वाढ केली जाऊ शकते. सध्या मेट्रोच्या एका डब्यात एकावेळी ३२० प्रवासी प्रवास करू शकतात. त्यानुसार एका वेळी मेट्रो ९५० ते १,००० प्रवाशांना वाहून नेऊ शकते.





