Pune: श्री गणेशाची गजरथातून मिरवणूक

पुणे – पुण्याचा राजा मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीची मिरवणूक सकाळी ११ वाजता गजरथातून सुरू झाली. स्वप्नील सरपाले आणि सुभाष सरपाले यांनी फुलांचा गजरथ तयार केला. तर श्रींची प्रतिष्ठापना २ वाजून ०५ मिनिटांनी प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते करण्यात आली.
मंडळाचे यंदा १३८ वे उत्सव वर्ष असून, गुरूजी तालीम गणपती मंदिरापासून सुरू झालेली मिरवणूक गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी चौकातून उत्सव मंडपात आली. यावेळी मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज ब्रास बँड, गुरुजी प्रतिष्ठान ढोल ताशा पथक, रुद्रांश ढोल ताशा पथक आणि आवर्तन ढोल ताशा पथक सहभागी झाले. तसेच तृतीय पंथियांचे “शिखंडी’ पथकही मिरवणुकीत सहभागी झाले.
यावेळी ढोल-ताशांचा गजरात बाप्पांचे उत्साहपूर्ण वातावरणात प्रतिष्ठापना झाली. यावर्षी सातारा येथील सजावटकार सुशील निगडे आणि विकास पवार यांचे मार्गदर्शनाखाली संपूर्ण फायबर ग्लासमध्ये बनवलेल्या आकर्षक “गज महला’ने भाविकांना आकर्षित केले, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष राजू परदेशी यांनी दिली.





