Pune : प्रभातने कोठारींची परंपरा जपली – पृथ्वीराज चव्हाण

पुणे – दैनिक प्रभातचे पत्रकार अविनाश गोडबोले यांनी त्यांच्या अग्रलेखांमध्ये प्रभातचे संस्थापक वा. रा. कोठारी यांची परंपरा जपल्याचे दिसून येत असून, सामाजिक संस्कृतीचा योग्य वापर त्यांच्या लिखाणात दिसून येतो, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. अविनाश गोडबोले लिखित असा डांगोरा शब्दांचा या पुस्तकाचे प्रकाशन चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी अध्यक्षस्थानी संतसाहित्याचे अभ्यासक डाॅ. सदानंद मोरे, ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर, प्रभातचे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, कार्यकारी संपादक अविनाश भट उपस्थित होते. स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला पुण्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की गोडबोले यांच्या सर्व अग्रलेखांत समकालीन समस्यांचा वेध असून, आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा आढावा आहे. सध्या चर्चेत असलेल्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरही चव्हाण यांनी भाष्य केले आणि देशात गेल्या काही वर्षांत ज्या ठळक घडामोडी घडल्या, त्यांची अभ्यासपूर्ण चिकित्सा करताना केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि कार्यशैलीवर बोट ठेवले. ते म्हणाले, अनेक देशांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे.
मात्र, आताच्या केंद्र सरकारने हे सध्या गुंडाळून ठेवले आहे. कॉंग्रेसच्या काळात संशोधन आणि विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रावर देशाच्या एकूण जीडीपीपैकी १ टक्के खर्च केला जायचा. मात्र, आता तो ०.७ टक्क्यांवर आला आहे. नामवंत शिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापक मिळत नाहीत किंवा भरले जात नाहीत, त्यामुळे ४० टक्के पदे रिक्त आहेत. या अशा वातावरणात देशात चांगले शिक्षण कसे मिळणार. मात्र, सरकार त्यावर काही बोलत नाही, असेही ते म्हणाले.
अनंत बागाईतकर यांनी त्यांची स्वत:ची पत्रकारिता ही प्रभातमधील लेखांपासूनच झाल्याचे नमूद केले. जो सामाजिक वारसा प्रभातचे संस्थापक कोठारी यांनी जपला, त्याचे उत्तरदायित्व गोडबोले यांनी स्वीकारले आहे, ही समाधानाची गोष्ट आहे. पहिलीपासून हिंदी लादणे अशास्त्रीय असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.
अविनाश गोडबोले यांनी मनोगत व्यक्त केले, तर प्रभातचे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी यांनी गोडबोले यांचे एक व्यक्ती म्हणून स्वभावाची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या काही अग्रलेखांसंदर्भात भाष्य केले. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.





