बाणेर – पुणे महापालिका निवडणूक प्रभाग क्र. ९ मधील बाणेर-बालेवाडी परिसरात नागरिकांच्या समस्या व मागण्यांना केवळ आश्वासनांपुरते न ठेवता ठोस कृतीतून सोडवण्याचा निर्धार अपक्ष उमेदवार पूनम विशाल विधाते यांनी व्यक्त केला. बाणेर-बालेवाडी नागरी मंच तसेच बाणेर-बालेवाडी-पाषाण रेसिडेंट्स असोसिएशनच्या नागरिकांनी मांडलेल्या सर्व अडचणी, समस्या व मागण्या त्यांनी लेखी प्रतिज्ञापत्राद्वारे औपचारिकरीत्या स्वीकारल्या आहेत.या प्रतिज्ञापत्रातील प्रत्येक मुद्दा टप्प्याटप्प्याने पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी स्वतः घेणार असल्याचे पूनम विधाते यांनी स्पष्ट केले. या प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, ड्रेनेज तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांशी संबंधित प्रश्नांवर वेळबद्ध आणि ठोस उपाययोजना राबवण्याची कटिबद्धता त्यांनी व्यक्त केली. हा केवळ शब्दांचा करार नाही, तर नागरिकांच्या विश्वासावर दिलेली हमी आहे. प्रत्येक समस्येचे नियोजनबद्ध निराकरण करून नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करणे हेच माझे उद्दिष्ट आहे, असे पूनम विधाते यांनी सांगितले. नागरिकांमध्ये या प्रतिज्ञापत्राबाबत सकारात्मक प्रतिसाद दिसून आला असून, प्रभागातील विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.