पुणे : प्रदूषण नियंत्रणाचा आदेश पालिकेतच

नियमावलीबाबत क्षेत्रीय कार्यालये अनभिज्ञच : अंमलबजावणी वाऱ्यावर
पुणे –शहरात बांधकामे तसेच पाडकामांच्या ठिकाणी उडणारे धोकादायक धुलिकण रोखण्यासाठी राज्यशासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचनांच्या अंमलबजावणीच्या तपासणीसाठी 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर 15 पथके नेमण्याचे आदेश मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी दि.9 नोव्हेंबर रोजी काढले होते. मात्र, हे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना चक्क दि. 21 नोव्हेंबर रोजी पाठवण्यात आले आहेत. परिणामी, एकाही क्षेत्रीय कार्यालयाने ही तपास पथके अद्यापही नेमलीच नसल्याची बाब समोर आली आहे. आयुक्तांनी काढलेले आदेश मंगळवारी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना ई-मेलद्वारे पाठवण्यात आले.
हवा प्रदूषणात पुणे शहरही धोकादायक पातळीवर आहे. त्यामुळे शहरामध्ये सुरू असलेली बांधकामे आणि उड्डाणपूल, तसेच मेट्रो प्रकल्पांच्या ठिकाणी धोकादायक धुलिकण रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना राज्य पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाने जाहीर केल्या आहेत.
या अनुषंगाने महापालिकेनेही नियमावली जाहीर केली. त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालय, पर्यावरण विभाग तसेच शिक्षण विभागावर सोपवली होती. त्यानुसार बांधकाम प्रकल्प, उड्डाणपूल, महापालिकेची विकासकामे तसेच राडारोडा आणि बांधकामाचे साहित्य वाहतूक करताना नियमांची अंमलबजावणी केली जाते की नाही याची तपासणी 15 क्षेत्रीय कार्यालयाची पथके करणार आहेत. या पथकात उपअभियंता (स्थापत्य), आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता तसेच महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचा एक जवान असणार आहे. या पथकाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्याची तपासणी करून त्याचा अहवाल दररोज सादर करायचा होता.
दरम्यान, आयुक्तांच्या आदेशानंतर करण्यात आलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी बुधवारी तातडीची बैठक बोलावली आहे.
अधिकारी पातळीवर दुर्लक्ष
आयुक्तांनी आदेश काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि. 10 नोव्हेंबरपासून महापालिकेस सुट्टी होती. त्यानंतर गुरुवारी ( दि.16) प्रशासकीय कामकाज पूर्णवेळ सुरू झाले. आता 21 नोव्हेंबर होईपर्यंत हे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना पाठवलेच नव्हते. माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात वृत्त प्रकाशित होऊनही अधिकाऱ्यांनी “लेखी आदेश आपल्याला मिळालाच नाही,’ असे भासवत काहीच हालचाल केली नसल्याचे समोर आले.





