पुणे : पोलिसांचा कणखरपणा त्रासदायक नको

पुणे – पोलिसांमध्ये कणखरता नक्कीच असायला पाहीजे, त्याचा लोकांच्या सुरक्षेसाठी चांगला उपयोग झाला पाहीजे. परंतु, हाच कणखरपणा जनतेला त्रासदायक होऊ नये, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केले.
पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्रातर्फे आयोजित व भारतीय पोलीस सेवेतील निवृत्त अधिकारी वसंत के.सराफ लिखित “ऑन पोलिस ऍन्ड पोलिसींग’ या पुस्तकाचे पांडे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी प्रशिक्षण व खास पथकाचे अतिरीक्त पोलीस महासंचालक संजयकुमार, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सराफ, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अतिरीक्त पोलीस महासंचालक रितेशकुमार, पोलीस संशोधन केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेशकुमार उपस्थित होते.
पांडे म्हणाले की, पोलिसांना खात्यात अनेक चढ-उतार व चांगल्या-वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत काम करताना पोलिसांना भावनिक होऊन चालत नाही. तर तेथे कणखरपण असणे गरजेचे आहे. परंतु, हाच कणखरपणा जनतेला त्रासदायक ठरेल, असे होऊ नये, याकडे पोलिसांनी लक्ष दिले पाहीजे. पोलिसांनी कायम लोकाभिमुख कामालाच प्राधान्य दिले पाहीजे. त्यासाठी पोलीस हवालदारापासून ते भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना खास प्रशिक्षण दिलेले असते. सराफ यांचे पुस्तक पोलिसांसाठी दिशादर्शक ठरेल, असे सांगून पांडे यांनी मी नवखा अधिकारी असताना अनेक अडचणी यायच्या, त्यावेळी सराफ सरांकडून आपल्याला चांगले मार्गदर्शन मिळाल्याच्या आठवणींना उजाळा दिला.





