पुणे : पुणे शहर पोलिसांनी संघटित गुन्हेगारीविरोधात मोठी मोहीम राबवत आंतरराज्य पातळीवरील अवैध शस्त्रउद्योगाचा पर्दाफाश केला आहे. शहरातील विविध भागातून २१ अवैध पिस्तुले आणि दारूगोळा जप्त करण्यात आला असून, पुढील तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्यप्रदेशात छापा टाकून ३६ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. मागील तीन आठवड्यांपासून विमानतळ, काळेपडळ, गुन्हे शखा आणि एईसी पथकांनी केलेल्या धडक कारवाईत एकूण २१ शस्त्रे जप्त झाली. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मध्यप्रदेशात पहाटेची धाड या तपासदरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यप्रदेशातील उमारती गावात पहाटे छापा टाकण्यात आला. येथे अवैध शस्त्रनिर्मितीचा मोठा अड्डा पोलिसांना सापडला. या कारवाईत ३६ संशयितांना जेरबंद करण्यात आले तर मोठ्या प्रमाणात शस्त्रे व सुटे भाग जप्त केले गेले. शस्त्र बनविणाऱ्या ५० भट्टयांचा नाश करण्यात आला तर शस्त्रांवर नावे उमटविण्याचे साहित्य जप्त करण्यात आला. उच्चस्तरीय तांत्रिक मदत आणि भक्कम पथक या धाडीसाठी शीघ्र कृती दल, गॅस गन सेक्शन, वायरलेस आणि सीसीटीव्ही टीम यांसह मोठा फौजफाटा सज्ज ठेवण्यात आला होता. मोबाइल सर्व्हिलन्स व्हॅन, बुलेटप्रूफ जॅकेट्स, बॉडी वॉर्न कॅमेरे यांचाही वापर करण्यात आला. ‘यूएसए’ ब्रँडचा शस्त्र धंदा तपासातील प्राथमिक निष्कर्षानुसार, जप्त केलेली अवैध शस्त्रे “Umarati Shikalgar Arms (USA) या नावाने तयार करून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांत पुरवली जात असल्याचा संशय आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांच्या भूमिकेनुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असून अवैध शस्त्र पुरवठा साखळीचा पूर्ण उलगडा करण्यासाठी तपास वेगाने चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.