Pune : ऐतिहासिक गणेशोत्सवासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

पुणे – पुणेकरांच्या हृदयातील सर्वांत मोठा सोहळा श्री गणेशोत्सव यंदाही दिमाखात साजरा होणार आहे. शहरात ३९५९ सार्वजनिक गणेश मंडळे आणि तब्बल ७४ हजार ५९४ खासगी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. हा उत्सव पाहण्यासाठी पुणे शहर, ग्रामीण भाग, तसेच इतर जिल्ह्यांतून लाखो भाविकांचा लोंढा येणार असून, पुणे पोलीस दलाने व्यापक सुरक्षेचे नियोजन केले आहे.
यात १३० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, एआय- पॉवर्ड व्हिडिओ ॲनालिटिक्स, ड्रोनद्वारे एरियल सर्व्हिलन्स, जीपीएस ट्रॅकिंग, अँटी-ड्रोन गन्स, ५० मेटल डिटेक्टर आणि १५० हँड-हेल्ड डिटेक्टर्स अशी अत्याधुनिक यंत्रणा तैनात केली जाणार आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पथके, अँटी-चेन स्नॅचिंग, मोबाइल व वाहन चोरी प्रतिबंधक दल, गुन्हे शाखेचे विशेष पथक उत्सवभर गस्त घालणार आहे. ६ सप्टेंबर व ७ सप्टेंबर रोजीच्या भव्य मिरवणुकीदरम्यान सुमारे …. पोलीस कर्मचारी, ११०० होमगार्ड, एसआरपीएफ कंपनीचा फौजफाटा रस्त्यावर असेल.
यावर्षीचा उत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जात असून, शहरातील निवडक चौकांवर विद्युत रोषणाई, पोलीस बँडचे सादरीकरण, प्रशिक्षित श्वानांचे डॉग शो अशी विशेष आकर्षणे असतील. ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी कडक अंमलबजावणी, मद्यविक्रीवर संपूर्ण बंदी, तसेच मेट्रो स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी विशेष नियोजन केले आहे.
सोहळा अविस्मरणीय बनवा
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आवाहन केले आहे, की, गणेशोत्सव हा पुण्याचा सन्मान आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करून हा सोहळा सुरक्षित, शांततामय आणि अविस्मरणीय बनवावा.
त्या मंडळांना यंदाही प्रतिबंध नाही
मंडळांचे मंडप मागील वर्षी जेथे आणि जेवढे मोठे होते, यंदा तेवढेच आहेत. मागील वर्षी काही मंडळांनी नियमांची अंमलबजावणी केली नव्हती. त्या मंडळांना यंदाही कोणता प्रतिबंध केला जाणार नाही. मात्र, त्यांना नियमावली आणि वाहतूक नियोजनाचे नियम पाळण्यास सांगितल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.





