Pune Police: “शहर सोडा, नाही तर 7 पिढ्यांची आठवण देऊ’; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा गुन्हेगारांना सज्जड दम

पुणे – “बेकायदेशीर धंदे केले, गँग चालवून खंडणी मागितली आणि बळाच्या जोरावर जमीन खाली करावयाला लावत असाल, तर हे शहर सोडून जा. नाही तर तुम्हाला तुमच्या सात पिढ्यांची आठवण होईल अशी कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांना दिला.
पोलीस उपायुक्त परिमंडळ-५, पुणे शहरच्यावतीने सोमवारी किंमती मुद्देमाल वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे आदी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त म्हणाले, “पोलीस ठाण्यात बऱ्याच वर्षांपासून पडलेल्या बेवारस मुद्देमालाबाबतही अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. जे मुद्देमाल चोरीला जातात, त्या वस्तूंमागे संबंधितांच्या भावना असतात. कधीकधी आम्ही संवेदना विसरतो, काही महिलांचे मंगळसूत्र असतात, काही जणांची वाहने असतात. प्रत्येकाला ते परत मिळेल अशी अपेक्षा असते. लोकांना ते परत मिळवण्यासाठी वकिलांची फी भरून आणि कोर्टाच्या चकरा मारून वेळ जातो म्हणून आम्ही ही प्रक्रिया आमच्या बाजूने सुरू केली आहे. लोकांना आर्थिक बोजा येणार नाही, याची खात्री आम्ही घेतली आहे. आज ८० फिर्यादींना २ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल परत करत आहोत.
बेवारस वाहनांबाबत आता कारवाई करण्याचा सूचना दिल्या आहेत. त्याचे मालक शोधण्यासाठी सांगितले आहे. इतर बेवारस मुद्देमालसुद्धा तपासामधून त्यांच्या मालकांना शोधण्याचे सूचना दिल्या आहेत. लवकरात लवकर इतर परिमंडळातसुद्धा अशी कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे. बोपदेव घाट प्रकरणातसुद्धा स्थानिक पोलिसांच्या मदतीने आम्हाला आरोपी सापडले. जनता ही खाकीमधील पोलीस नसली तरीसुद्धा तुम्ही एक पोलीस आहात, जेवढे अधिकार आम्हाला आहेत तेवढेच अधिकार तुमच्याकडे आहेत.” असेही अमितेश कुमार म्हणाले.
…तर नागरिकांनी संपर्क करावा
पोलीस आयुक्त म्हणाले, “अवैध धंद्याविरोधातील मोहिमेस आमचे प्राधान्य आहे. मद्य- गांजा विक्री, बेकायदा हुक्का पार्लर, बार उशिरापर्यंत सुरू असतील अथवा गैरकृत्य दिसल्यास नागरिकांनी पोलिसांशी तातडीने संपर्क करावा. एकदा निराकरण झाले नाही तर पुन्हा पुन्हा संपर्क करावा.’





