Pune News : शहरात बेकायदेशीरपणे तयार होणाऱ्या हातभट्टी दारूविरोधात पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ या विशेष मोहिमेअंतर्गत अवैध गावठी दारू तयार करणारे आणि विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गावठी दारु अड्ड्याची माहिती पोलिस संकलीत करून ही कारवाई करणार आहे. अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांनी दिली. शहरात काही ठिकाणी मोठ्याप्रमाणात हातभट्टी दारुची अवैध पद्धीतीने निर्मिती होते. ही दारु शहराच्या विविध भागात विक्रीसाठी पाठवली जाते. प्रामुख्याने लोणीकंद, लोणीकाळभोर, लक्ष्मीनगर, येरवडा, वाघोली, काळेपडळ, येवलेवाडी या परिसरात हातभट्टी दारु तयार करण्याचे अड्डे आहेत. अशा ठिकाणांची माहिती संकलीत करून कारवाई करण्याच्या सुचना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या आहेत. हातभट्टी दारू पिल्यामुळे अनेकांची तब्येत बिघडते, तर काही बहुतांश प्रकरणात या दारूची दिर्घकाळ नशा करणाऱ्यांचा मृत्यू देखील झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. उन्हाळ्यात गावठी दारूने मद्यप्राशन करणाऱ्यांना उष्माघाताचा धोका संभवतो. त्यामध्ये त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. तर दुसरीकडे गावठी दारू पिल्याने विषबाधा झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. ही दारू कोणत्याही नियमांशिवाय आणि असुरक्षित पद्धतीने तयार केली जाते. त्यामुळे त्यात भेसळ किंवा विषारी पदार्थ असण्याची शक्यता जास्त असते. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन पुणे पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभाग एकत्रीतरित्या शहरात कारवाई करणार आहे.