Pune Crime news : शहरातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या धोरणाअंतर्गत पुणे पोलिसांनी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर मोठी कारवाई केली आहे. लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शफिक अजीम शेख ( ४८, रा. २३८९, न्यू मोदीखाना, कॅम्प, पुणे) याला महाराष्ट्र प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. (Pune Crime news) पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व प्रकारचे अवैध धंदे पूर्णपणे बंद करून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार लष्कर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील शफिक शेख याच्यावर यापूर्वी महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्ट कलम ९३ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्याच्याकडून भविष्यात अवैध व्यवसाय न करण्याचा बॉन्डही लिहून घेण्यात आला होता. मात्र, त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा न झाल्याने आणि अटींचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी याची गंभीर दखल घेत पुढील कठोर कारवाई केली. (Pune Crime news) दि. १० एप्रिल रोजी पोलीस आयुक्तांनी एमपीडीए कायद्यान्वये आदेश काढत शफिक शेख याला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार त्याला छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले आहे. या कारवाईमुळे न्यू मोदीखाना, सोलापूर बाजार आणि कॅम्प परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून परिसरात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. पोलिसांनी यापुढेही अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. ही कारवाई पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०५ राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त लष्कर विभाग संगिता शिंदे अल्फान्सो यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप पवार, सहायक पोलीस निरीक्षक विशाल दांडगे, पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे व अवधूत देशमुख, सहाय्यक पोलीस फौजदार जगदीश पाटील तसेच पोलीस अंमलदार भागवत राऊत आणि तपास पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली. (Pune Crime news)