पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडाळाच्या (पीएमपीएमएल) संचालक बैठकीत प्रवास भाडेवाढीला मान्यता देण्यात आली. तसेच, प्रस्तावित कि.मी. आधारित स्टेज रचनेतही बदल करण्यात आल्यामुळे प्रवाशांना जादा तिकिट दर द्यावे लागणार आहे. तसेच, दैनंदिन पास आणि मासिक पासमध्येही वाढ करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रात पीएमपीएकडून बससेवा दिली जाते. राज्य शासनाच्या दि. २० डिसेंबर २००५च्या पत्रानुसार २० डिसेंबर २०१४ पासून परिवहन महामंडळाने प्रवासी तिकिट दरवाढ केली. त्यामध्ये १ ते ७८ कि.मी.साठी दोन कि.मी.अंतराने १ ते ४० पर्यंत स्टेज रचना निश्चित करून दर आकारणी करण्यात आली. मात्र, आता राज्य शासनाच्या ३१ मार्च २०१८ च्या पत्रानुसार भाडेप्रणालीमध्ये बदल करून १ ते ३० कि.मी. अंतरासाठी ५ कि.मी.च्या अंतराने ६ स्टेज आणि त्यापुढे ३० ते ८० कि.मी. अंतरासाठी १० कि.मी.च्या अंतराने ५ स्टेज असे एकूण ११ स्टेज १ ते ८० कि.मी.च्या अंतरासाठी सहरचना करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वी पहिल्या दोन कि.मी.साठी प्रवाशांना पाच रुपये प्रवासी भाडे द्यावे लागत होते. ते आता पहिल्या पाच किमीसाठी दहा रुपये प्रवासी भाडे द्यावे लागणार आहे. पासेसच्या दरामध्ये फेरबदल पुणे आणि पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीसाठी असलेल्या दैनिक पास ४० रुपये (एक मनपा हद्दीसाठी) आणि मासिक पास ९०० रुपये (एक मनपा हद्दीसाठी) इतके होते. ते पासेस रद्द करून दोन्ही मनपा हद्दीसाठी एकच दैनिक पास रुपये ७० आणि मासिक पास रुपये दीड हजार इतका करण्यात आलेला आहे. तसेच, पीएमआरडीए हद्दीसाठी दैनिक पास १२० रुपये ऐवजी १५० रुपये करण्यात आला आहे. मात्र, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांच्या पासेस व पीएमआरडीएच्या मासिक पासमध्ये कोणताही बदल नाही. प्रस्तावित स्टेज प्रस्तावित कि.मी. प्रस्तावित दर रुपये ३ ते १२ वयोगटातील प्रस्तावित भाडे १ १ ते ५ १० ५ २ ५.१ ते १० २० १० ३ १०.१ ते १५ ३० १५ ४ १५.१ ते २० ४० २० ५ २०.१ ते २५ ५० २५ ६ २५.१ ते ३० ६० ३० ७ ३०.१ ते ४० ७० ३५ ८ ४०.१ ते ५० ८० ४० ९ ५०.१ ते ६० ९० ४५ १० ६०.१ ते ७० १२० ६० ११ ७०.१ ते ८० १२० ६०