पुणे : आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, रस्ते, रस्ता सुरक्षा, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध द्याव्यात. तसेच पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी आतापासूनच नियोजन करावे. वारकऱ्यांना कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले. श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळा नियोजनाबाबत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी डूडी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त बापू बांगर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर महाराज मोरे , जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त विक्रमसिंह मोरे, वैभव मोरे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ आदी उपस्थित होते. पालखी सोहळा नियोजनाच्या अनुषंगाने यंत्रणांना तयारी करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा यासाठी ही बैठक लवकर आयोजित करण्यात आल्याचे सांगून जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, श्री क्षेत्र आळंदी तसेच श्री क्षेत्र देहू संस्थानच्यावतीने करण्यात येणाऱ्या सूचनांवर सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्यात येईल. बैठकीदरम्यान दिलेल्या निर्देशांनुसार कार्यवाहीचा अहवाल संबंधित यंत्रणांनी मे महिन्यातील पुढील बैठकीत सादर करावा. आरोग्य सुविधा, शौचालये, पाणीपुरवठा आदी सर्व सुविधा गतवर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी आळंदी येथील दर्शनबारीच्या अनुषंगाने जमीन आरक्षण, पालखी मार्गस्थ असताना वाहतूक कोंडी होऊ नये, स्वागतासाठी लावण्यात येणारे ध्वनीक्षेपक, ध्वनीवर्धक, पालखी मार्गस्थ असताना तसेच पाण्याचे टँकर भरण्याच्या ठिकाणी अखंड वीजपुरवठा, राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाने पालखी महामार्गाची अपूर्ण कामे करून घेणे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारक्षेत्रातील रस्त्यांची डागडुजी आदींच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. पालखी सोहळ्यात कोणत्याही घटनेच्या अनुषंगाने संपर्क साधण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून प्रांताधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच वेगवान मोबाईल नेटवर्कसाठी बूस्टर लावण्यात येतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, पुणे शहरच्या प्रांताधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, खेड प्रांताधिकारी अनिल दौंडे, हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने, दौंड प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे, वारकरी महामंडळ उपाध्यक्ष डी. डी. भोसले पाटील, संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, महानगरपालिका, नगरपरिषद, आरोग्य विभाग, पोलीस, एनडीआरएफ, अग्निशमन विभाग, पशुसंवर्धन विभाग, परिवहन विभाग, राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.