पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे उपाध्यक्ष नरेंद्र पावटेकर यांनी आंदोलना दरम्यान, पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले. सुदैवाने अनुचित घटना थोडक्यात टळली. यावर पोलिसांनी आंदोलकांना चांगलाच चोप देत अद्दल घडवली. ही घटना महापालिका मेट्रो स्थानकावरील मेट्रो मार्गिकेवर घडली. याप्रकरणी १५ ते २० कार्यकर्त्यांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते नरेंद्र पावटेकर यांनी दुपारी दोनच्या सुमारास महापालिका मेट्रो स्टेशनमध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. जाताना त्यांच्या हातामध्ये पेट्रोलच्या बाटल्या होत्या. सोबत काही महिला कार्यकर्त्याही होत्या. त्यांनी थेट मेट्रो मार्गिकेवर (ट्रॅक) धाव घेत आंदोलन सुरु केले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस उपायुक्त गिल्ल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना हात जोडून तब्बल तासभर विनंत्या केल्या. त्यांची समजूत काढून खाली उतरुन तोडगा काढू असेही सांगितले. मात्र आंदोलक ऐकण्यास तयारीत नव्हते.

एवढ्यात पावटेकर आणि एक तरुण मार्गिर्किवरील कठड्यावर चढले. तेथून ते कधीही तोल जाऊन खाली पडले असते. गिल्ल यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना शिवीगाळ करण्यात आली. यामुळे त्यांनी पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांना फोन लावून दिला. मात्र पावटेकर यांनी जगताप यांनाच शिवीगाळ करत ते आम्हाला पुढे येऊ देत नाहीत, असते म्हणत बोलण्यास नकार दिला. परिस्थितील हाताबाहेर जात असताना पुन्हा एकदा पोलिस आंदोलकांच्या दिशेने जाऊ लागले. तेव्हा पावटेकर यांनी उपायुक्त गिल्ल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत यांच्या अंगावर बाटलीतून आणलेले पेट्रोल टाकले. यामुळे पोलीस पथक गडबडले.

या नंतर मात्र गिल्ल यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलकांची गचांडी पकडत त्यांना सहकाऱ्यांच्या मदतीने मेट्रो स्थानकात ओढत आणले. उद्दामपणा करणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप देत गाडीत कोंबले. यानंतर सर्वांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आंदोलकांच्या झटापटीत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. सुदैवाने उन्हामुळे किंवा मेट्रोच्या ओव्हरहेड वायरमुळे पोलिसांच्या अंगावरील पेट्रोलने पेट घेतला नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.