Pune : कोणते पक्ष असली हे जनतेने दाखविले

पुणे : महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक बहुमत देत निवडून आणले आहे. एवढेच नव्हे, तर महाराष्ट्रात कोणती शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष असली आणि नकली आहे, याचा निर्णयही जनतेने दाखवून दिला आहे, अशा शब्दांत गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांनी पुण्यात विरोधकांचा समाचार घेतला.
बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात पंतप्रधान आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा- २ अंतर्गत महाराष्ट्रातील २० लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र, तर १० लाख लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रथम हप्ता अमित शहा यांच्या हस्ते शनिवारी वितरीत करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील तब्बल २० लाख लोकांना आज एकाच वेळी २० लाख घरे मिळत आहेत. घरकुल मिळालेल्या लोकांमध्ये वेगळाच आनंद दिसत आहे. जेव्हा देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी जनधन खाती उघडत होते, तेव्हा देशाचे विरोधी पक्षनेता राहुल गांधी म्हणत होते, की खाते उघडताय पण त्या खात्यात पैसे कुठून आणणार आहे. राहुल गांधींनी पाहून घ्यावे, की महाराष्ट्रातील तब्बल १० लाख लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रथम हप्ता आज त्याच खात्यावर जमा झाला आहे.
२५ कोटी लोक दारिद्र्यरेषेबाहेर
देशातील तब्बल ६० कोटी लोकांना घर, वीज, अन्न आणि आरोग्याच्या सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत. याशिवाय तब्बल २५ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या बाहेर आणले आहे. १३ कोटी लोकांना शौचालय बांधून दिले आहेत. अमृत भारत रेल्वे, अटल सेतू, मुंबई, पुणे, नागपूर अशा प्रमुख शहरांत मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. कोणत्याही देशात जे काम झाले नसेल, ते काम पंतप्रधान मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत केले आहे. पुणे, कोल्हापूर येथील विमानतळाचा विकास होत आहे. खडकवासला ते फुरसुंगीपर्यंत पाण्याचा बंदिस्त बोगदा तयार करण्यात येत आहे. आज २० लाख लोकांना घरांचे वाटप होत असून, येत्या दिवाळीत सर्व लाभार्थी नवीन घरात आनंदाने प्रवेश करतील, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.





