पुणे जिल्हा: शरद मोहोळ खूनप्रकरणी पौड पोलिसांत पाच जणांवर गुन्हे दाखल

मुळशी – देशी बनावटीचे पिस्टल विनापरवाना जवळ बाळगून त्यामधून फायर सराव केला आहे, म्हणून भारतीय हत्यार कायदा कलम नुसार शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकरसह पाच जणांविरोधात पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साहील उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (सुतारदरा, कोथरूड, पुणे), नामदेव महिपती कानगुडे (सुतारदरा, कोथरूड), सतीश संजय शेडगे (माताळवाडी फाटा, भूगाव, ता. मुळशी), आदित्य विजय गोळे (रा. संत तुकारामनगर, गोळे आळी, पिरंगुट) आणि नितीन अनंता खैरे (गादिया इस्टेट, कोथरूड) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अजितकुमार भगवान पाटील (पोलीस उपनिरीक्षक, युनिट -3 गुन्हे शाखा पुणे शहर आणि शरद बबन वाकसे (पोलीस हवालदार युनिट -3 गुन्हे शाखा पुणे शहर) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात आतापर्यंत चार गुन्हे दाखल करण्यात आलेले असून पुणे पोलिसांकडून तीन गुन्हे पौड पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. सुतारदरा येथे झालेल्या शरद मोहोळ खून प्रकरणात गोळीबाराचा सराव मुळशी तालुक्यातील कोळवण खोर्यातील हाडशी येथे करण्यात आला असल्याचे तपासात पुढे आले आहे. हा सराव जुलै 2023च्या शेवटच्या आठवड्यामध्ये बोडकेवाडी हाडशी आणि ऑक्टोबर 2023चे पहिल्या आठवड्यात हाडशी येथील सत्य साईबाबा मंदिराच्या मागील बाजूला असे दोनदा करण्यात आला.
हाडशी येथील एक शेतातील बांधावर जांभळाच्या झाडाच्या बुंध्यावर तर सत्य साईबाबा ट्रस्टचे मागील बाजूस चालू असलेल्या बांधकामासमोर एका झाडाच्या बुंध्यावर एकदा चार तर दुसर्यांदा तीन बेकायदेशीर विनापरवाना अग्निशस्त्र बाळगून फायरिंगचा सराव या पाच जणांनी केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी आणि सहाय्यक फौजदार बी. जी. शिंदे हे करीत आहे.





