Pune: रेल्वेच्या मेगाब्लाॅकमुळे प्रवाशांची एसटीला गर्दी

पुणे – मुंबईतील रेल्वेच्या मेगाब्लाॅकमुळे पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या ट्रेन रद्द झाल्या. परिणामी ही सर्व गर्दी एसटीकडे वळल्यामुळे शनिवारी (दि. 1) सकाळपासून स्वारगेट, पुणे स्टेशन आणि वाकडेवाडी (शिवाजीनगर) एसटी स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढलेली दिसून आली. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाकडून 35 जादा बस सोडण्यात आल्या. मात्र, प्रवासी संख्येच्या तुलनेत बस कमी असल्यामुळे स्थानकावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनवरील (सीएसएमटी) फलाट विस्तारीकरणासह अन्य तांत्रीक कारणामुळे पुणे-मुंबई धावणारी डेक्कन क्वीन दोन दिवस, तर प्रगती सहा दिवस रद्द करण्यात आली आहे. दि. 1 आणि 2 जून रोजी पुण्यातून सुटणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द झाल्यामुळे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी एसटी स्थानकावर येणार, त्यामुळे एसटी प्रशासनाकडून दोन दिवसांसाठी 35 जादा बस सोडण्याचे नियोजन केले, अशी माहिती विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी दिली.
खंडाळा घाटात वाहतूक कोंडी; बस उशिराने
बहुतांश व्यक्तींनी खासगी वाहने बाहेर काढली, तसेच मुंबईहून पुण्यात येणाऱ्यांची गर्दी अधिक, त्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटात वाहतूक कोंडी झाली. लांबपर्यंत वाहनांच्या रांगा गेल्यामुळे दुपारनंतर बहुतांश गाड्यांना पुण्यात येण्यास उशीर होत होता. आधीच ऊन तापलेले, त्यात बस नसल्यमुळे डोकी तापली पर्यायाने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
पुणे आणि स्वारगेट स्टेशनवर प्रवाशांची अधिक गर्दी
पुणे स्टेशन येथून मुंबईला (दादर, परेळ) दररोज 116 फेऱ्या होतात. तर स्वारगेट येथून दादर, ठाणे, बोरीवली याठिकाणी बस सुटतात. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील सर्व गर्दी आज सकाळपासून या दोन्ही स्टेशनवर होती. सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे अधिकाऱ्यांचीही धावपळ झाली. दुपारनंतर गाड्यांना उशीर होत असल्यामुळे पुण्यातून जाणाऱ्या गाड्यांनाही उशीर होवू लागला. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत स्टेशनवर प्रवाशांची गर्दी पहायला मिळाली.
जादा गाड्या सोडणार असल्याने शिवाजीनगर येथेही गर्दी
पुणे आणि स्वारगेट स्थानकातून मुंबईला बस सुटतात. मात्र, रेल्वे ब्लाॅकमुळे शिवाजीनगर (वाकडेवाडी) येथून प्रवाशांना जाता यावे, यासाठी एसटीकडून ८ जादा बस सोडण्याचे नियोजन केले. त्यामुळे प्रवाशांनी या स्थानकावरही गर्दी केली. मात्र, याठिकाणी बसची संख्या कमी असल्यामुळे आणि मुंबईवरून बस उशीरा येत असल्याने प्रवाशांना तासंतास थांबावे लागले.
आजही जादा बसेस
दि. 2 जून रोजी मेगाब्लाॅक असल्यामुळे या दिवशीही एसटीकडून 35 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये नियमीत फेऱ्याबरोबर स्थानकावर गर्दी अधिक झाली तर जादा बसेस सोडण्यात येतील. शनिवारी दिवसभरात पुणे स्टेशन येथून 7, स्वारगेट-10 आणि शिवाजीनगर स्थानकातून 8 जादा बस सोडण्यात आल्या.
चौकट
खासगी वाहनांची चलती…
स्थानकांवर गर्दी, त्यात बस उशिराने येऊ लागल्यामुळे टॅक्सी किंवा कॅबने जाऊ असे म्हणत प्रवाशांनी स्थानकाबाहेर गर्दी केली. त्यामध्ये काही टुरिस्ट वाहनांसह खासगी कारचालकांनी संधी साधली. तसेच खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी जादा बस सोडल्या होत्या.




