Pune Party Case : पुण्यातील पार्टी प्रकरण: ड्रग पेडलर सापडेना, पोलिसांना आरोपींच्या मोबाईलमध्ये काय मिळालं?

Pune Party Case : पुण्यातील ड्रग पार्टी प्रकरणाची चर्चा राज्यभरात होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयासह सहा आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा साठा जप्त केला होता. यामुळे आरोपींना कोकेन व गांचा पुरवठा कोणी केला याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. आता याबाबत एका ड्रग पेडलरचे नाव समोर आले असून, पोलिसांना अद्यापर्यंत तो सापडलेला नाही.
खराडीतील हॉटेल स्टेबर्डमधील येथे एप्रिल व मे महिन्यातही ‘हाउस पार्टी’ झाल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींचे मोबाईल, लॅपटॅाप जप्त केले आहेत. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली. आरोपींच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांशी चॅटिंगसह पार्टीचे फोटो व व्हिडीओ सापडले असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.
या प्रकरणात पोलिसांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल मनीष खेवलकर (वय ४१, रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, हडपसर), निखिल जेठानंद पोपटाणी (वय ३५, रा. डीएसके सुंदरबन, माळवाडी रस्ता), समीर फकीरमहंमद सय्यद (वय ४१, रा. पॅलेस ऑर्किड सोसायटी, एनआयबीएम रस्ता), सचिन सोनाजी भोंबे (वय ४२, रा. द्वारकानगर, वाघोली), श्रीपाद मोहन यादव (वय २७, रा. पंचतारानगर, आकुर्डी), ईशा देवज्योत सिंग (वय २२, रा. कुमार बिर्ला सोसायटी, औंध) आणि प्राची गोपाल शर्मा (वय २३, रा. गोदरेज ग्रीन सोसायटी, म्हाळुंगे) यांना अटक केली आहे.
पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ
आरोपींविरोधात खराडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायलयाने आरोपींच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. तर दोन महिला आरोपींची न्यायलयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती आहे.
पार्टीसाठी हुक्का तयार करण्यासाठी राहुल नावाच्या व्यक्तीचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात निषन्न झाले आहे. या राहुल नामक व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत. यामुळे या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याची देखील पोलीस चौकशी करत असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.





