पुणे: पालखी मार्ग असेल हिरवागार

रस्त्यालगत देशी झाडांची लागवड करणार ः वनमंत्री मुनगंटीवार
पुणे – पुणे ते पंढरपूर पालखी मार्गावर देशी झाडाची लागवड करणार, अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी वनविभागाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत केली. यावेळी वारकरी, वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले, “वारकरी बांधवांनी माझी भेट घेत जे राष्ट्रीय महामार्ग पालखी महामार्ग म्हणून बांधण्यात येणार आहेत, ते हरीत पालखी मार्ग व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. पण, हा वनविभाग आणि महाराष्ट्र शासनाचा विषय नाही.
पण, तरीही वारकरी बांधवाची मागणी पूर्ण करण्यासाठी वारकरी आणि केंद्र सरकार यांचा दुवा म्हणून आणि वनप्रेमी म्हणून आज या बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीत पालखी महामार्गावर देशी वड, पिंपळ, कडूलिंब, आंबा अशी घनदाट वृक्ष लावावीत. तसेच राष्ट्रीय महामार्ग हरित महामार्ग होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने आम्ही केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत.’ यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्याकडून हरित महामार्गासाठी आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.





