पुणे – शहरातील पालखी सोहळ्यांनी हडसपरकडे प्रस्थान करताच महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून शहरात अवघ्या काही तासांतच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे काही तासांतच पालखी मार्ग चकाचक झाला. या वेळी पालखी मुक्कामाच्या परिसरातील तब्बल ३०० टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले, तसेच त्याची विल्हेवाटही लावण्यात आली. महापालिकेकडून मागील तीन दिवसांपासून पालखी मुक्कामांच्या परिसरात दिवसातून तीन वेळा स्वच्छता केली जात होती. त्यामुळे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले. शहरात रविवारी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी विसावला होता. या दोन्ही पालख्या मंगळवारी सकाळी सासवड आणि यवतकडे रवाना झाल्या. भवानी पेठ परिसरात या दोन्ही पालख्या मुक्कामी असल्याने या भागातील शाळा, धर्मशाळा, मंदिरे, तसेच रस्त्याच्या परिसरात महापालिकेने मंडप घालून दिलेल्या ठिकाणी हे वारकरी मुक्कामाला थांबले होते. या कालावधीत पुण्यातील काही दानशूर व्यक्ती, तसेच सेवाभावी संस्थाकडून त्यांच्यासाठी जेवणाची, अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. महापालिकेने या भागात सुमारे ६७५ कर्मचारीस्वच्छतेसाठी नेमले होते. याशिवाय पालखी ज्या भागातून पुढे जाईल, त्या मार्गावर संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे प्रत्येकी ६० कर्मचारी स्वच्छतेसाठी तैनात करण्यात आले होते. त्यांच्यामार्फत सुमारे ३०० टन कचरा संकलन करण्यात आले असल्याचे घनकचरा व्यस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी सांगितले.