पुणे: अतिवेग नडला… ;महामार्गांवर ‘आरटीओ’ची टेहळणी

10 महिन्यांत 3,185 वाहनांवर दंड
पुणे – पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) मागील दहा महिन्यात तीन हजार 185 ओव्हर स्पीड वाहनांवर कारवाई केली आहे. त्यांच्यावर 63 लाख 70 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. यात जानेवारी महिन्यात सर्वाधिक 580 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
महामार्गांवर नियमभंग करणाऱ्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) महामार्ग पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जाते. हे अपघात अतिवेग, मानवी चुकांमुळे होत असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांना लगाम लावण्यासाठी “स्पीडगन’च्या माध्यमातून कारवाई केली जात आहे.
पुणे-मुंबई, बंगळुरू, नगर, सोलापूर, नाशिक महामार्गांवर पुणे “आरटीओ’ने एप्रिल ते जानेवारी 2023 पर्यंत 3 हजार 185 सुस्साट धावणाऱ्या वाहनांवर स्पीडगनच्या माध्यमातून कारवाई केली आहे. अतिवेग, सीट बेल्ट न लावणे, लेट कटिंग करणाऱ्या वाहनांवारही कारवाई केली जात आहे. “आरटीओ’कडून कारवाईबरोबरच वाहनचालकांचे समुपदेशन देखील करण्यात येते.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक्स्प्रेस-वेसाठी कार वेग मर्यादा 100 किलोमीटर प्रति तास आणि घाट विभागात 50 किमी प्रतितास निश्चित. महामार्गांवर काही वाहनांचा वेग 160 ते 180 कि.मी./ प्रतितास आढळून आल्याचे आरटीओचे निरीक्षण.
अतिवेगाने वाहन चालवल्याने प्रवासाचा वेळ वाचत असला, तरी अपघाताचीच संभावना अधिक असते. वाहन चालक स्वत: सह इतरांचा जीव धोक्यात घालत असतात. त्यामुळे वाहन चालकांनी अतिवेगाचा मोह टाळून सुरक्षित प्रवास केला पाहिजे. अतिवेगाने वाहतूक करणाऱ्यांवरील कारवाई भविष्यात सुरू राहील.
– डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे





