Pune Organ Donation: अवयवदानात पुणे महाराष्ट्रात ‘नंबर वन’! ७९ दात्यांमुळे २०७ रुग्णांना मिळालं नवजीवन

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सरत्या वर्षांत अवयवदानात संपूर्ण महाराष्ट्रात पुणे विभाग आघाडीवर होता. या वर्षांत ७९ दात्यांनी अवयवदान केले. यामुळे २०७ रुग्णांना जीवनदान मिळाले. संपूर्ण भारतात अवयवदानात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे.पुणे येथील झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर (झेडटीसीसी) मार्फत अवयवदान आणि प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदविण्यात आली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार एकूण ७९ मेंदूमृत दात्यांचे २०७ गरजू रुग्णांमध्ये अवयव प्रत्यारोपण करण्यात आले आहे.
या प्रत्यारोपणांमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपणांची संख्या सर्वाधिक असून, यामुळे ११७ जणांना जीवनदान मिळाले आहे. त्या खालोखाल ६७ यकृत प्रत्यारोपण, १३ फुफ्फुस प्रत्यारोपण आणि चार हृदय प्रत्यारोपण करण्यात आले, तसेच हृदय आणि फुफ्फुस एकत्रित प्रत्यारोपण एक, मूत्रपिंड आणि हृदय प्रत्यारोपण एक, तसेच मूत्रपिंड आणि स्वादुपिंड प्रत्यारोपण एक झाले आहे.
मेंदूमृत्यूची कारणे पाहता २८ दात्यांचा मृत्यू अपघात किंवा इजा (ट्रॉमा) यामुळे झाला असून, ५१ दाते आजारपण किंवा इतर नॉन-ट्रॉमा कारणांमुळे मेंदूमृत झाले. एकूण अवयवदात्यांपैकी ७२ टक्के पुरुष (५७ दाते), तर २८ टक्के महिला (२२ दाते) आहेत. महिला दात्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व असलेल्या महिलेचा समावेश आहे.



