Pune : मुक्त विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरु अर्जासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत

पुणे : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांतर्गत असलेल्या अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरण व विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षण अभ्यासक्रम्, बी. एड. (सेवांतर्गत), बी. एड. (विशेष) तसेच विज्ञान विद्याशाखेच्या शिक्षण अभ्यस क्र्मांव्यतीरिक्त उर्वरित सर्व शिक्षण अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश प्रक्रिया असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली.
विद्यापीठाच्या विविध ७१ अभ्यासक्रमासाठी ही प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाकडून राबविली जात आहे. यामध्ये २७ प्रमाणपत्र अभ्यासक्रम, २० पदविका, ८ पदवी व १६ पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही फक्त ऑनलाइन पद्धतीने राबविली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अर्जाच्या शुल्काचा भरणा देखील ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
नियमित पदवीसोबत दूरशिक्षणाद्वारे अधिकची पदवी विद्यार्थ्यांना घेता येणार असून, १५ फेब्रुवारीपर्यंत यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन अर्ज करता येणार असल्याची महिती विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड यांनी दिली. सविस्तर माहिती मुक्त विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.





