पुणे : प्रथम वर्ष प्रवेशासाठी एकच सीईटी?

सध्या प्रत्येक महाविद्यालयाकडून स्वतंत्र परीक्षा
विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैशांचा अपव्यय होतो
विद्यापीठ अधिसभा सदस्यांनी वेधले लक्ष
पुणे – बारावी निकालानंतर पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रत्येक महाविद्यालयात वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी “सीईटी’ घेतली जाते. या विद्यार्थ्यांच्या वेळ व पैशांचा अपव्यय होत असून, वेळप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रवेशाला मुकावे लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित प्रत्येक महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यापीठाने स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करून अभ्यासक्रमनिहाय एकच सीईटी घ्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभेची वार्षिक सभा येत्या बुधवारी (दि.27) होणार आहे. यात अधिसभा सदस्यांनी प्रश्न आणि ठरावाद्वारे महत्त्वाच्या विषयांकडे विद्यापीठाचे लक्ष वेधले आहे. दादाभाऊ शिनलकर यांनी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यापीठाने अभ्यासक्रम निहाय एकच सीईटी घ्यावे आणि त्याप्रमाणे गुणवत्तेनुसार संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चिती करावी. ही पद्धत विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे. अशी शिफारस त्यांनी ठरावाद्वारे केली. त्या विषयावर अधिसभेत चर्चा होण्याची चिन्हे आहेत.
सध्या प्रत्येक महाविद्यालयातील पदवीच्या पहिल्या वर्षासाठी स्वतंत्र सीईटी घेतली जाते. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे आणि प्रवेश शुल्क भरावे लागते. त्यानंतर सीईटी घेतली जाते आणि निकाल जाहीर होतो. प्रवेश क्षमतेचा विचार करून पहिली, दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून त्यानुसार प्रवेश दिला जातो.
हीच पद्धत शहरातील सर्वच महाविद्यालयांत आहे. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयातील प्रवेशासाठीची “सीईटी’करिता अर्ज करणे, शुल्क भरणे यात विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा खर्च होतो. याचा मानसिक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एक धोरण तयार करून विद्यापीठाने एकच सीईटी घेणे विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरणार आहे.




