Pune : दहा दिवसांत आरटीईअंतर्गत केवळ १३ हजार ७४० बालकांचेच प्रवेश निश्चित

पुणे : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर गेल्या दहा दिवसात केवळ १३ हजार ७४० बालकांचेच प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाले आहेत. प्रवेशासाठी आणखी पाच दिवसांचा कालावधी राहिलेला आहे.
यंदा राज्यातील ८ हजार ८५३ शाळांमध्ये १ लाख ९ हजार ८७ जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी ३ लाख ५ हजार १५२ अर्ज दाखल झाले होते. प्रवेशासाठी १० फेब्रुवारी रोजी ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली. त्यात १ लाख १ हजार ९१६ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. प्रतिक्षा यादीत ८५ हजार ४५७ बालकांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रवेशासाठी लॉटरीच्या माध्यमातून निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील.
पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करुन शाळांमध्ये बालकांचे प्रवेश निश्चित करण्याची सुविधा १४ फेब्रुवारी पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत कागदपत्रांची पडताळणी करुन शाळांमध्ये प्रवेश घेत असलेल्या बालकांची संख्या १५ हजाराच्या पुढेही गेलेली नाही. कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी पालकांची धांदल उडू लागलेली आहे. त्यामुळे शाळांमध्ये प्रवेश निश्चित करण्याचा वेग हवा तेवढा आढळून येत नाही.
आत्ता पर्यंत अहिल्यानगरमध्ये ८२४, मुंबईमध्ये ६६६, नाशिकमध्ये ६७३, पालघरमध्ये ११५७, पुण्यात १९२९, ठाण्यात २०९६ याप्रमाणे शाळा प्रवेश निश्चित झाले आहेत. उर्वरित जिल्ह्यात खूपच कमी प्रवेश झालेले आहेत.




