Pune : हवेली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात उरली फक्त दहा गावे

पुणे : वाढत्या शहरीकरणामुळे हवेली पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र ५८ गावांवरुन अवघ्या दहा गावांवर आले आहे. आता तर हवेली पोलीस ठाणे दुसऱ्यांदा विस्थापित होणार आहे. सध्या पोलीस ठाणे अभिरुची मॉल शेजारी एका छोट्या जागेत कार्यरत आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांतर्गत हवेली पोलिस ठाण्यामध्ये २०१० च्या सुमारास ५८ हून अधिक गावे होती. हे कार्यक्षेत्र गावे विकसीत होत गेल्याने हळू हळू कमी होत गेले. आता हवेली पोलीस ठाण्याअंतर्गत फक्त दहाच गावे राहिली आहेत. गावे वगळता हा परिसर आता पुणे शहर पोलिस आयुक्तालयात विलीन झाला आहे. ज्यामुळे पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्र कमी होत आहे.
या भागातील बहुसंख्य गावे, ज्या पूर्वी ग्रामपंचायती होत्या, त्याभागातील वाढत्या शहरीकरणामुळे पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात विलीन करण्यात आल्या. त्यामुळे शहर पोलिसांचे कार्यक्षेत्रही वाढले आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोंढवा, उंड्री, फुरसुंगी आणि लगतचा परिसर होता. मात्र नंतर कोंढवा पोलिस ठाण्याची निर्मिती झाली. आता कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत फुरसुंगी आणि काळेपडळ या दोन नवीन पोलिस ठाण्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारने २००७ साली अधिसूचना जारी करून हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विठ्ठलवाडी, हिंगणे खुर्द, उत्तमनगर, नऱ्हे, धायरी, जांभुळवाडी आणि आंबेगाव हे क्षेत्र भारती विद्यापीठ आणि सिंहगड रोड पोलिस ठाण्यांमध्ये विलीन केले.
मागील आठवड्यात राज्य सरकारने नांदेड शहर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्राची सीमांकन करणारी अधिसूचना जारी केली, ज्यामध्ये हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नांदेड गाव, कोल्हेवाडी, किरकटवाडी, नांदोशी, धायरी आणि खडकवासला या परिसरांचा समावेश आहे. ही क्षेत्रे आता शहर पोलिसांत विलीन झाली आहेत. या सर्व भागात आता मोठ्या टाउनशिप, उंच इमारती, मोठ्या संख्येने कार्यालये आणि मॉल्स आहेत. या स्थितीत ग्रामीण पोलिसांना अशा विकसित भागाकडे मनुष्यबळाअभावी लक्ष देता येत नाही. आता हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत फक्त गोऱ्हे, डोणजे, खानापूर आणि पानशेत रोडवरील इतर छोटी गावे राहिली आहेत.
पूर्वी शहराच्या मध्यभागी असलेल्या हवेली तहसील कार्यालयाजवळ असलेले पोलीस ठाण्याचे आवार सन २००८ मध्ये सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक येथे स्थलांतरित करण्यात आले होते.
आता आम्ही पोलिस ठाणे डोणजे गावात स्थलांतरित करण्यासाठी पर्यायी जागा शोधत आहोत. तोपर्यंत आम्ही सध्याच्या जागेतूनच कामकाज चालू ठेवू. ब्रिटीश राजवटीत, प्रशासकांनी तहसील कार्यालय, महसूल कार्यालय, न्यायालय, सब-जेल आणि पोलिस ठाणे खडकमाळ अळी येथे एकाच परिसरामध्ये बांधले होते.
– पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक




