पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या चार धरणांत मिळून अवघा 10.65 टीएमसी म्हणजे 36.54 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शेतीसाठी सोडावे लागणारे आर्वतन, शहराला पिण्यासाठी लागणारे पाणी, उन्हाळ्यात होणारे बाष्पीभवन , पाऊस लांबणीवर पडला तर या सर्व बाबींचा विचार करून पाण्यासाठी पुढील दीड -दोन महिने काटकसर करावी लागणार आहे. सद्यःस्थितीत खडकवासला धरणातून शेतीसाठी 1100 क्युसेकने कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे. मागील वर्षी पाऊस चांगला झाला अन् धरणे 100 टक्के भरली. त्यामुळे धरणात चांगला पाणीसाठा जमा झाला. उन्हाळ्यात पाण्याची मागणी आणखी वाढणार आहे. याबरोबरच पाणीचोरी, गळती आणि बाष्पीभवन यांमुळे धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होतो. तसेच मागील काही वर्षांचा अनुभव पाहता मान्सूनचे वेळेवर आगमन होते. मात्र, पाऊस महिना-दीड महिना लांबणीवर पडतो. त्यामुळे जुन-जुलैमध्ये पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागते. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठाचे जुलैअखेरपर्यंत नियोजन करणे आवश्यक आहे.