Pune : शहराभोवतीची एक हजार अतिक्रमणे ३ दिवसांत काढली

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराभोवती असणाऱ्या राष्ट्रीय व राज्यमार्गावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मोहिम मागील तीन दिवसांपासून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतली आहे. या तीन दिवसात पुणे-नाशिक रस्ता, पुणे-सोलापूर रस्ता व चांदणी चौक ते पौड या तीन महामार्गालगतची सुमारे एक हजार अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. या कारवाईमुळे या भागातील वाहतुक कोंडी सोडविण्यास मदत होणार आहे.
पुणेकरांना वाहतूक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी पीएमआरडीएने विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, बुधवारी पुणे नाशिक रोड, पुणे सोलापूर रस्ता व पुणे चांदणी चौक ते पौड रस्ता अतिक्रमण व अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. बुधवारी सकाळपासून सुरु करण्यात आलेल्या या कारवाई जवळपास २५२ अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.
बहुतांश स्थानिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतले. या अतिक्रमण मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ३ मार्चला २०१ अनधिकृत बांधकाम तर ४ मार्चला ४५३ अनधिकृत बांधकामे काढण्यात आली. गत तीन दिवसात एकूण ९०४ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून ९० हजार ६०० चौरस मीटरचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांमार्फत सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम करू नये असे, आवाहन करण्यात आले.





