Pune : विद्यापीठ चौकातील पुलाची एक बाजू एक मे रोजी खुली होणार
पुणे : पुणे विद्यापीठ चौकामधील ब्रेमेन चौक ते ई-स्केअर दरम्यानचा पूल येत्या एक मे रोजी वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे, तसेच विद्यापीठ चौकातील पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली झाल्यानंतर या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. दरम्यान, या चौकात बाणेर आणि राजभवनकडे येणाऱ्या पुलाचे काम ऑगस्टपर्यत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी शुक्रवारी दिली.
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलेल्या मतदार संघातील समस्यांविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी भाजपचे दत्तात्रय खाडे, गणेश बागडे, रवींद्र साळेगावकर, सुनील पांडे, आनंद छाजेड, किरण ओरसे, सचिन वाडेकर, प्रकाश सोळंकी उपस्थित होते.
ससून रुग्णालयामध्ये प्रशासकीय स्थिरता नाही, तेथील अनेक सरकारी डॉक्टर खासगी प्रॅक्टीस करतात याविषयी विचारले असता, तेथे चांगला प्रशासक येणे आवश्यक आहे. त्यामुळे तेथील प्रशासकीय व्यवस्थेत बदल करण्याची आवश्यकता आहे अशी सूचना सरकारला केल्याचे शिरोळे म्हणाले. पुणे शहराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीचे सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात यावे. यामध्ये कॅमेरे कसे बसवता येतील, त्याची देखभाल दुरुस्ती याचा विचार करावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली, त्यावर येत्या महिन्याभरात निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे शिरोळे म्हणाले.
अंमली पदार्थांचे वाढते सेवन लक्षात घेता सोशल ऑडिट करणे, पुणे-मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉर प्राधिकरण स्थापन करणे, जीबीएस रुग्णांसाठी अनुदानात वाढ मिळावी, आदी मागण्याही सरकारकडे केल्याचे शिरोळे यांनी सांगितले. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे महापालिकेमध्ये विलीनीकरण करण्याच्या संदर्भात येत्या १५ दिवसात मुख्यमंत्र्यांच्या अध्येक्षतेखाली बैठक होईल असे शिरोळे यांनी नमूद केले.





