Pune : पंढरपूर कार्तिकी यात्रेसाठी शंभर जादा एसटी बस धावणार

पुणे – पंढरपूर येथील कार्तिकी यात्रेनिमित्त भाविकांच्या सुविधेसाठी दि. ७ नोव्हेंबरपर्यंत पुणे एसटी विभागातून पंढरपूरसाठी १०० जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, ४० जणांचे ग्रुप बुकिंग असल्यास मुख्य स्थानकातून बससुविधा उपलब्ध होणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दि. २ नोव्हेंबर रोजी भागवत एकादशी आहे. तर दि. ५ नोव्हेंबरला कार्तिकी पोर्णिमा आहे. त्यासाठी पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांसह भाविक मोठ्या संख्येने श्री क्षेत्र पंढरपूर येथे दाखल होतात. त्यामुळे दि. २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान पंढरपूर यात्रेला पुण्यातून पंढरपूरला जाणाऱ्या आणि येणाऱ्या भाविकांसाठी दि. ७ नोव्हेंबरपर्यंत जादा बससेचे नियोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा.
तसेच शहरातील मुख्य बसस्थानकावरून किमान ४० प्रवाशांचे ग्रुप बुकिंग केल्यास जादा बस पंढरपूरसाठी सोडण्यात येतील. तरी प्रवाशांनी खासगी वाहतुकीचा प्रवास टाळावा आणि सुरक्षित सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे एसटी विभागाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी केले आहे.





