शेतकऱ्यांना न्याय्य व उचित मोबदल्यासाठी महत्त्वपूर्ण प्रस्ताव पुणे – पुरंदर विमानतळासाठी होणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांना न्याय्य व उचित मोबदला मिळावा यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण प्रस्ताव सादर केला आहे. भूसंपादित जमिनींसाठी शेतकऱ्यांना प्रति एकरी एक कोटी रुपयांची भरपाई, तसेच घर, गोठा, विहीर, बोअरवेल, पाईपलाईन, फळझाडे व वनझाडे यांसारख्या घटकांच्या मूल्याच्या दुप्पट रकमेची नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. भूसंपादन झालेल्या सात गावांतील शेतकरी प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. ही बैठक एखतपूर, खानवडी, कुंभारवळण, मुंजवडी, पारगाव, उदाचीवाडी व वनपुरी या सात गावांतील शेतकऱ्यांसमवेत घेण्यात आली. शासनाने दि. १७ मार्च २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उचित भरपाई, पारदर्शकता आणि शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण या दृष्टीने २०१३ च्या भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत अधिनियमाच्या तरतुदींनुसार तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून शासकीय नियमांनुसार मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बैठकीत शेतकरी प्रतिनिधींनी विविध मागण्या मांडल्या. चारपटऐवजी पाचपट दर मिळावा, अशी मागणी केली. जिल्हा नियोजन निधीतून गावांना अधिक निधी देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पुन्हा गावागावांत बैठक घेण्याची सूचना केली. बाजारभावानुसार एक कोटींचा दर अपुरा असल्याचे नमूद करून अधिक भरपाईची मागणी केली. या सर्व मागण्यांवर जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, नियमांच्या चौकटीत राहून शेतकऱ्यांना अधिकाधिक न्याय मिळावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. संमतीने भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना मिळणारे लाभ १. संपादित जमिनीच्या क्षेत्राच्या 10 टक्के एवढा विकसित भूखंड वाटप २. प्रकल्पग्रस्तांचे घर संपादन झाल्यास निवासी भूखंड मोबदला दराने दिला जाणार ३. भूमिहीन होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना 750 दिवसांच्या किमान कृषी मंजुरी इतकी रोख रक्कम ४. अल्पभूधारक ठरणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना 500 दिवसांच्या कृषी मंजुरीएवढी रक्कम मिळेल. ५. घर संपादन झालेल्या कुटुंबांना 40,000 रुपयांचे स्थलांतर अनुदान दिले जाईल. ६. जनावरांच्या गोठा/शेड स्थलांतरासाठी प्रतिगोठा 20,000 रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाईल. ७. प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एका सदस्यास आयटीआयमध्ये एक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण व नोकरीत प्राधान्य